आता ड्रायव्हिंग लायसन्स‘आधार’शी लिंक करणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पॅनकार्ड आणि मोबाईल नंबरपाठोपाठ आता ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहनचालक परवाना आधारकार्डाशी जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बोगस ड्रायव्हिंग लायसन्सचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी आधार क्रमांकाशी ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करण्यात येणार आहे.

याआधी पॅनकार्ड आणि मोबाईल नंबर आधारकार्डाला जोडण्यात आले होते. त्यानंतर आता ड्रायव्हिंग लायसन्स आधारला जोडण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी एक सॉफ्टवेअर बनविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. याप्रकरणी केंद्रीय रस्ते आणि काहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केल्याचेही रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. ते डिजिटल हरयाणा समीट २०१७ या कार्यक्रमात बोलत होते.

आधार कार्ड ही व्यक्तीची वैयक्तिक नव्हे, तर डिजिटल ओळख आहे, असे रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. याआधीही प्रसाद यांनी वाहनचालक परवाना आणि आधारकार्ड जोडण्यासंदर्भात भाष्य केले होते. बोगस वाहनचालक परवान्यांची संख्या कमी करण्यासाठी तसेच मद्यपि वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

एनआयसीने तयार केले ‘सारथी ४’ सॉफ्टवेअर
सर्व राज्यांतील ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी लिंक करण्यासाठी नॅशनल इर्न्फोरमेशन सेंटरने (एनआयसी) सारथी ४ हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे सर्व लायसन्स आधारशी लिंक होणार आहे. त्यामुळे यापुढे देशात बोगस लायसन्स वापरणे शक्य होणार नाही.

पॉलिसीसाठीही आधार अनिवार्य
एलआयसीची कोणतीही नवी पॉलिसी घेण्यासाठी तसेच विम्याची रक्कम काढण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. नवीन पॉलिसी वाढविण्यासाठी तसेच पॉलिसीच्या ऑनलाइन व्यवहारांसाठी आधार कार्डाची गरज लागणार आहे.

आधारमधील डाटा सुरक्षितच
आधारकार्डावरील वैयक्तिक माहिती चोरी होण्याची शक्यता नाही. हा डाटा पूर्णपणे सुरक्षितच आहे. देशातील १२० कोटी लोकांकडे आधार कार्ड असून ५७ कोटी बँक खाती आधारशी लिंक झाली आहेत. ज्याद्वारे देशात ५७ हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे – रविशंकर प्रसाद, केंद्रीय कायदामंत्री.