रेल्वेतील ब्लँकेट शेवटच्या वेळेस कधी धुतलं ते समजणार

सामना ऑनलाईन । मुंबई

रेल्वेच्या एसी कोचमधून तुम्ही जर लांब पल्ल्याचा प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी आता एक खूशखबर आहे. कारण बऱ्याचदा रेल्वेच्या एसी कोचमधील ब्लँकेट आणि चादरींचा दर्जा अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त असल्याची तक्रार प्रवासी करत असतात. मात्र आता लवकरच शेवटच्या वेळेस ब्लँकेट कधी धुतलं गेलं आहे हे समजणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेने धुतलेल्या दिवसाची तारीख असलेला एक स्टॅम्प हा ब्लँकेटवर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच आता रेल्वेतून प्रवास करताना स्टॅम्प पाहून ब्लँकेट आणि चादरी अस्वच्छ असतील तर किंवा स्टॅम्पवरील तारीख जूनी असल्यास तक्रार करू शकतो.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसी कोचमधील प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ब्लँकेट आणि चादरी धुतलेल्या तारखेचा स्टॅम्प असल्यामुळे प्रवाशांनाही त्याबाबत माहिती मिळेल. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतच वृत्त प्रसारित केलं आहे. दररोज जवळपास रेल्वेतील प्रवाशांकडून १८,००० ब्लँकेट वापरले जातात. मात्र त्यापैकी कमीत कमी ८,००० ब्लँकेटवर स्टॅम्प असतात. मात्र आतापासून धुतलेल्या सर्व ब्लँकेटवर स्टॅम्प असणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात ‘कॅग’नेही आपल्या अहवालात रेल्वेतील अन्नपदार्थ, अस्वच्छता यामुळे दिवसेंदिवस प्रवाशांच्या तक्रारीत वाढ होत असल्यामुळे याबाबत ताशेरे ओढले होते. रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करताना बऱ्याचदा ब्लँकेट आणि चादरी वापरल्या जातात. मात्र बरेच दिवस त्या धुतल्या नसल्यामुळे त्या अस्वच्छ असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी असतात. त्यामुळेच केवळ प्रवाशांच्या तक्रारी सोडवण्यासाठीच नाही तर त्यांना उत्तम सेवा पूरवण्यात याव्या यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. तसेच रेल्वेतील नियमांप्रमाणे प्रत्येक ब्लँकेट महिन्यातून एकदा धूतलं जाणार आहे. त्यामुळचे आता एका महिन्याच्या आतमध्ये लवकरच एसी कोचमधील ब्लँकेट धूतली जाणार आहेत.