आता प्रत्येक स्पर्धेत पदक मिळवू!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने १३ वर्षांनंतर आशिया चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्यानंतर संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग हुरळून गेलेले नाहीत. ‘आशिया कप’ ही तर फक्त सुरुवात आहे. हिंदुस्थानी महिला संघ यापुढे प्रत्येक स्पर्धेत पदक मिळवेल असा आत्मविश्वास प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी व्यक्त केला आहे.

हरेंद्र सिंग म्हणाले, या एका विजेतेपदाने संतुष्ट होणाऱ्यांपैकी मी नाहीये. चीनविरुद्धच्या फायनलपूर्वी मी खेळाडूंवर फारसे दडपण टाकले नाही. तुम्ही पदक पक्के केले आहे. त्यामुळे आता पदकाचा रंग कोणता हे ठरविणे तुमच्या हातात आहे. मात्र, हिंदुस्थानच्या महिला नक्कीच विजेतेपदाला गवसणी घालतील याचा मला ठाम विश्वास होता. संघातील बहुतांश खेळाडू या सामान्य कुटुंबांतील असल्याने त्यांच्या परिवारासाठी हे जेतेपद नक्कीच बहुमोल असेल. संघातील खेळाडूंबद्दल बोलताना हरेंद्र सिंग म्हणाले, दरम्यान, हॉकी इंडियाकडून विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला एक लाखाचे बक्षीस जाहीर केले.

प्रतिस्पर्धी संघाच्या वरचढ क्रमवारीकडे अजिबात लक्ष देऊ नका. इंग्लंडचा महिला संघ व अर्जेंटिनाच्या पुरुष संघाने आपल्याहून सरस संघावर मात करीत अनुक्रमे ‘विश्वचषक’ व ‘रियो ऑलिम्पिक’चे सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे संघांची क्रमवारी ही केवळ एक आकडा होय. लढतीच्या दिवशी आपण कोणालाही हरवू शकतो. त्यामुळे सकारात्मक विचारानेच मैदानावर उतरायला हवे – हरेंद्र सिंग