कायद्याचा भक्कम आधार

>> अॅड. उदय वारुंजीकर

प्रेमळ आजी आजोबा, प्रेमळ आईबाबा क्षणाचाही विचार न करता आपलं घर मुला-नातवंडांना देऊन टाकतात. पुढे मुलांचं वागणं बदलतं… आणि… मग अशावेळी कायदा ठामपणे ज्येष्ठांच्या मागे उभा राहतो. 

‘वाढलेले ताट द्यावे, पण बसायचा पाट देऊ नये’ असे ‘नटसम्राट’ या प्रसिद्ध नाटकातील वाक्य आहे. अर्थातच वरिष्ठ नागरिकांनी आपले राहते घर हे स्वतःच्याच नावावर आणि ताब्यामध्ये ठेवले पाहिजे. नाहीतर ‘घर का ना घाट का’ अशी परिस्थिती होते.

ज्येष्ठ नागरिकांबाबत धोरण अस्तित्वात आहे, पण त्याच्या अंमलबजावणीचे प्रश्न आहेत. २००७ सालामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि पालकांच्या संदर्भातला कायदा केंद्र सरकारने पारित केला, पण त्याची माहिती खूप लोकांना नाही. या कायद्याला प्रवाही बनविण्यासाठी असणारी यंत्रणा अपुरी आणि उदासीन आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार ज्येष्ठ नागरिकांना किंवा पालकांना आपल्या अपत्यांकडून दरमहा दहा हजार रुपयांपर्यंतची पोटगी मागता येते. अर्थातच मुलीकडूनही मागता येते.

अपत्य त्रास देत असेल आणि जर ते अपत्य सज्ञान असेल तर अशा अपत्याच्या विरोधात मनाई हुकूम मागावा लागू शकतो. सर्वसाधारणतः जन्मदात्या किंवा दत्तक आईवडिलांना कोण त्रास देत नाही, पण अपवादामुळेच नियम सिद्ध होतात. त्यामुळे जर कोणी अपत्य पालकांना त्रास देत असेल तर कारवाई करणे शक्य आहे. जर त्रास देणे, नुकसान करणे, धमकी देणे, इजा करणे असे फौजदारी गुन्हे घडले असतील तर पोलिसांकडे जाऊन गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. जर अन्य दिवाण कृत्ये आपल्याकडून घडत असतील तर दिवाणी न्यायालयाकडून मनाई हुकूम मागावा लागू शकतो.

सर्वसाधारणतः हिंदुस्थानमध्ये न्यायालयाची पायरी ही नाईलाज म्हणून चढली जाते. पण न्यायालय ताकदवान असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक किंवा पालकांना संरक्षण आदेश मिळू शकतो. जर बसायचा पाट म्हणजेच राहते घर राखायचे असेल तर गरज असल्यास फौजदारी किंवा दिवाणी करायला पाहिजे.

बक्षीसपत्र रद्दबातल होऊ शकते
ज्येष्ठ नागरिक किंवा पालकांकडून जर फसवून बक्षीसपत्र करवून घेतले असेल तर तेदेखील रद्दबातल होते. आईवडिलांना सोडून देण्याचा अपराध करणारे अपत्य या कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र होते. आजही दुर्दैवाने पंढरपूर, उजैन, मथुरा येथे अनेक सोडून दिलेले आईवडील दिसून येतात. जर अपत्य नसेल तर ज्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकाच्या पश्चात मालमत्ता मिळणार असते अशा व्यक्तीकडून पोटगी मागता येते. जर एकापेक्षा जास्त अपत्य असतील तर पोटगी समान प्रमाणात विभागली जाते. अगदी दत्तक घेतलेल्या अपत्याकडूनदेखील पोटगी मिळू शकते.