मुंबईकरांना आता वीजदरवाढीचा झटका!

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईसह राज्यभरातील ग्राहकांना वीजदर वाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीने दोन वर्षांत २९ हजार ४१५ कोटी रूपयांची दरवाढ करण्याविषयीचा प्रस्ताव राज्य विद्युत नियामक आयोगापुढे सादर केला आहे. विद्युत नियामक आयोगाने महावितरणाच्या दरवाढीच्या मागणीला मंजूर केले असून वीजदरात २१ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच एका युनिटमागे एक रूपया ३७ पैशांची वाढ होणार आहे, असे राज्य विद्युत ग्राहक संघटनेच्या प्रताप हेगडेंनी सांगितले.

महावितरणाकडून विद्युत आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावात फक्त दरवाढ करण्याचीच नाही तर स्थिर दरवाढीसाठीही परवानगी मागितली आहे. याचाही बोजा हा ग्राहकांवर पडणार आहे. वर्ष २०१५-१६ आणि वर्ष २०१६-१७ मधील खर्चाच्या ताळमेळासाठी महावितरणाने १२ हजार ४४२ कोटी रूपयांची मागणी विद्युत आयोगाकडे केली आहे.

राज्यात सामान्यतः घरगुती ग्राहकांसाठी १०० यूनिटपर्यंत चार रूपये २१ पैसे, ३०० यूनिटपर्यंत सात रूपये ९४ पैसे असा वीजदर प्रति यूनिट लागू आहे. तरिही चार टक्क्यांची वाढ करण्याची मागणी महावितरणाने विद्युत आयोगाकडे केली आहे. जर महावितरणाची ही मागणी मंजूर करण्यात आली तर १६ ते ३२ पैशांच्या दरवाढीचा भार घरगुती ग्राहकांना सोसावा लागणार आहे. ३०० पेक्षा जास्त यूनिटचा वापर करणारे ग्राहकांना १४ टक्के दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.