रायबरेली: एनटीपीसीमधील दुर्घटनेत ३० ठार

सामना ऑनलाईन । रायबरेली

उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथे असलेल्या एनटीपीसीच्या प्रकल्पात बॉयलर फुटून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला असून ६५ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. काही जखमींना उपचारासाठी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एनटीपीसीच्या प्रकल्पाजवळच्या रुग्णालयापासून सफदरजंग रुग्णालयापर्यंत राखीव मार्गिकेची व्यवस्था करण्यात आली. रुग्णवाहिकेतून २४ मिनिटांत २१ किमीचे अंतर पार करुन रुग्णांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. याआधी केंद्र सरकारच्यावतीने ऊर्जामंत्री आर के सिंह आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घटनास्थळाला भेट दिली तसेच जखमींची विचारपूस केली. राहुल गांधी यांनी दुर्घटनाग्रस्त प्रकल्प बंद करण्याची मागणी केली. दरम्यान केंद्र सरकारने दुर्घटनेच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

बॉयलरच्या सदोष निर्मितीमुळे अपघात?

बॉयलरचे तापमान नियंत्रित करणारा पंखा सदोष होता. तो योग्य प्रकारे काम करत नसल्यामुळे तापमान अनियंत्रित झाले आणि स्फोट झाला असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या प्रकरणी चौकशी पूर्ण झाल्यावर अंतिम निष्कर्ष स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले. बॉयलरचा पंखा सदोष होता की त्याच्यात मुद्दाम बिघाड करण्यात आला त्याचीही चौकशी सुरू आहे.