अणुबॉम्बचे बटण माझ्या हातात, ‘किम’ने नववर्षानिमित्त दिली अमेरिकेला धमकी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने अमेरिकेला धमकी देत नववर्षाचं स्वागत केलं आहे. अणुबॉम्बचं बटन माझ्या असल्याचं सांगत किम जोंगने अमेरिकेला धमकी वजा इशारा दिला आहे. नववर्षानिमित्त केलेल्या भाषणात किम जोंग म्हणाला की, ‘आम्ही अमेरिकेच्या कोणत्याही भागाला अणुबॉम्बच्या साह्याने टार्गेट करू शकतो. संपूर्ण अमेरिका आमच्या अणुबॉम्बच्या रेंजमध्ये आहे आणि या अणुबाम्बचं बटन माझ्या टेबलवर आहे. ही धमकी नसून वस्तूस्थिती आहे. अमेरिका कधीही आमच्या विरोधात युद्ध सुरू करू शकत नाही.’ उत्तर कोरियात गेल्या काही महिन्यापासून होत असलेल्या अण्वस्त्र चाचण्यांमुळे जगभरात तणावाची स्थिती आहे.

दरम्यान किम जोंगने दक्षिण कोरियासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात दक्षिण कोरियात होणाऱ्या विंटर ऑलिम्पिक स्पर्धेत उत्तर कोरियाचे खेळाडू पाठवण्यासंदर्भात किमनं म्हटलं की, दोन्ही कोरिया देशांचे अधिकारी लवकरच भेट घेतील आणि याबाबत विचार करतील. तसेच ही स्पर्धा यशस्वी होईल अशी आशा किमने व्यक्त केली. विंटर ऑलिम्पिकच्या माध्यमातून कोरियन देशांना प्रदर्शित करण्याची चांगली संधी असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.