कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार; असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश

bjp-logo

सामना प्रतिनिधी । कर्जत

दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांना निवडणुक प्रचाराच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांनी पाठींबा दिला असून, त्यांच्या प्रचारात सक्रियेतेने सहभागी होण्याच्या निर्णय घेतला आहे. कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करून महायुतीला पाठींबा व्यक्त केला आहे.

तालुक्यातील दुरगाव येथे प्रचाराच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सभेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री प्रा.राम शिंदे, महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. माणिकराव जायभाय, शशिकांत निबांळकर, भाऊसाहेब भगत, शंकरराव भगत, वसंतराव निंबाळकर, पोपटराव निंबाळकर, अशोकराव भगत, दिपक जायभाय, सुर्यभान जायभाय, विष्णु निंबाळकर, आजिनाथ मेहेत्रे, संजय जायभाय, सोनवणे सर, सहदेव जायभाय आदि कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे.

पालकमंत्री राम शिंदे म्हणाले की, देशात आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या विकासाच्या प्रक्रियेवर सामान्य माणसाचा विश्वास बसला आहे, सामान्य माणसांसाठी घेतलेल्या निर्णयांची होत असलेली अंमलबजावणी यामुळेच सर्वसामान्य समाज घटक आता भाजपाकडे आकर्षीत होऊ लागला आहे. पक्षाच्या या विकासाभिमूख कार्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचेच स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यकत केली.

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया ही राज्यभर सुरू झाली आहे. जिल्ह्यातही भाजपने केलेल्या विकास कामांवर लोकांचा विश्वास बसला आहे. पक्ष सोडून कोणी जात नाही तर पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे पक्षाचे पाठबळ वाढत आहे याचे समाधान वाटते.