नुरुल हसन यांच्या बद्दलचा व्हिडीओ आणि खुलासा

सामना प्रतिनिधी। नांदेड

धर्माबाद येथील सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याबाबत त्यांच्या समर्थकांनी नुकताच एक व्हिडीओ व्हायरल केला. यात नुरुल हसन यांनी २२ व्या वर्षी आयपीएस केले. ते राज्यातील सर्वात तरुण आयपीएस ऑफिसर आहेत. असा दावा करण्यात आला होता. मात्र यावर स्वतः नुरुल हसन यांनी खुलासा केला असून मी सर्वात तरुण आयपीएस ऑफिसर नाही आणि माझे वयही २२ नाही असे स्पष्ट केले आहे.

नुरुल हसन यांनी धर्माबाद येथे सहायक पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एक व्हिडीओ व्हायरल केला. यात ज्या वयात हल्लीची तरुण मुले कोणत्या तरी पक्षाच्या कार्यक्रमात सतरंज्या उचलतात. त्या वयात नुरुल हसन यांनी आयपीएस केले. याचबरोबर ते राज्यातील सर्वात तरुण आयपीएस ऑफिसर आहेत असे सांगण्यात आले होते. त्यानंतर सर्वत्र हसन यांचीच चर्चा होती. मात्र जेव्हा नुरुल यांना हा प्रकार कळाला तेव्हा त्यांनी यावर खुलासा केला. मी सर्वात तरुण आयपीएस ऑफिसर नाही आणि माझे वयही २२ नाही. असे ते म्हणाले. नंतर काही वृत्तवाहिन्यांनी नुरुल हसन यांची माहिती मिळवली. त्यानुसार नुरुल हसन यांचा जन्म ११ जुलै १९८६ मध्ये बिहारमध्ये झाला आहे. याचा अर्थ ते ३१ वर्षाचे आहेत.