तिरंगी मालिकेवर कांगारुंचा कब्जा, फायनलमध्ये किवींचा धुव्वा

सामना ऑनलाईन । ऑकलंड

तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर १९ धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने चषक उंचावला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १५१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने १४.४ षटकात ३ गडी बाद १२१ धावा केल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे उर्वरित खेळ होऊ शकला नाही आणि डकवर्थ लुईसच्या नियमानुसार ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाकडून ४ षटकात २७ धावा देऊन ३ बळी घेणारा फिरकी गोलंदाज अॅश्टन एगरला सामनाविराचा तर ग्लेन मॅक्सवेलला मालिकाविराचा किताब देऊन गौरव करण्यात आला.

फायनलमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडला चांगली सुरुवात मिळाली. मार्टिन गप्टिल आणि कोलिम मुनरोने अर्धशकीय भागिदारी केली. मात्र पाचव्या षटकात बिली स्टॅनलेकने गप्टिलला २१ धावांवर बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर दुसऱ्याच षटकात मुनरोही २९ धावा करून माघारी फिरला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार विलियम्सन (९), मार्क चॅपमॅन (८) झटपट बाद झाले. न्यूझीलंडकडून रॉस टेलरने ३८ चेंडूत ४३ धावा केल्या. टेलरच्या या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने ९ बाद १५० धावांचा टप्पा गाठला.

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने दमदार फलंदाजी केली. डेव्हिड वॉर्नर आणि आर्की शॉर्ट या जोडीने ७२ धावांची सलामी दिली. वॉर्नर २५ धावा काढून बाद झाला. आर्की शॉर्टने ३० चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावांची अर्धशतकीय खेळी केली. ऑस्ट्रेलियाला ३२ चेंडूत ३० धावांची आवश्यकता असताना पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे खेळ पुन्हा सुरू झाला नाही. त्यामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार ऑस्ट्रेलियाला विजेता घोषित करण्यात आले.