प्रदर्शित होण्याआधीच पद्मावतीने तोडला बाहुबली-२ चा रेकॉर्ड

सामना ऑनलाईन । मुंबई

दिग्दर्शक व निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या मेगाबजेट चित्रपट पद्मावतीने प्रदर्शित होण्याआधीच बाहुबली २ चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. बाहुबलीच्या तुलनेत पद्मावती ५०० हून जास्त चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. एकूण ८,००० स्क्रीनवर हा चित्रपट एकाच दिवशी झळकणार आहे.

या चित्रपटाची कथा अल्लाउद्दीन खिलजी आणि राणी पद्मावती यांच्यावर आधारित आहे. यात दीपिका पडुकोण राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार असून रणवीर सिंह खिलजीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर शाहीद कपूर राजा रतन सिंहची भूमिका अदा करणार आहे. पद्मावतीसाठी दीपिकाने ११ कोटी रुपये घेतले असून महागड्या अभिनेत्रींच्या यादीत तिचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील सगळ्याच मुख्य पुरुष अभिनेत्यांच्या तुलनेत दीपिकाने जास्त मानधन घेतले आहे.
चित्रपटाचे अंदाजे बजेट १७५ कोटी रुपये आहे. चित्रपट हिट होण्यासाठी पद्मावतीला २२० कोटी रुपयांचा गल्ला जमवावा लागणार आहे.
चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये युद्धभूमीचा सीन असून त्यावरच १२ कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे.

१८ नोव्हेंबर २०१७ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण अद्यापपर्यत चित्रपटाचे ७५ टक्केच चित्रिकरण पूर्ण झाले आहे. यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पद्मावती प्रदर्शित होणार, अशी शक्यता आहे.

दरम्यान, राणी पद्मावती आणि खिलजी यांच्यात संबंध दाखवण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर राजपूत समाजाने या चित्रपटाला जोरदार विरोध करत शुटींग थांबवले होते. त्यामुळे हा चित्रपट सुरळीत प्रदर्शित होईल का, यावर प्रश्नचिन्ह आहे.