सिंदखेडराजा तहसील कार्यालयावर धडकला ओबीसींचा मोर्चा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

मराठा समाजाला आरक्षण देताना सध्याच्या ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता तथा ओबीसी किंवा एसईबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करु नये यासाठी गुरुवारी सिंदखेडराजा तहसीलवर ओबीसी समाजातर्फे मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत घेतलेली संदिग्ध भूमिकेचा आम्ही ओबीसी बांधव तीव्र निषेध करत असून शासनाने मराठा समाजाला देऊ केलेल्या एसईबीसी म्हणजेच ओबीसी असे घटनात्मक प्रारूप असून हा शासनाने मांडलेला शब्दखेळ आहे. यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार असून सध्याच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी आमची मागणी आहे. सोबतच ओबीसीच्या आरक्षणानुसार प्रशासनामध्ये ओबीसीचे लोकसंख्येच्या तुलनेत प्रतिनिधित्व अत्यल्प असून शासनाच्या होऊ घातलेल्या नोकर भरतीमध्ये सध्या असलेल्या प्रचलित आरक्षणाच्या प्रमाणानुसारच नोकर भरती प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा शासनाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. याबरोबरच देश व महाराष्ट्रात ओबीसी समाजाच्या बंद केलेल्या सर्व शैक्षणिक शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करण्यात व उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, सरकारी नोकर भरती पदोन्नती मधील अन्याय शासनाने दूर करून ओबीसीच्या हक्काचे संरक्षण करण्यात यावे अशी मागणी सिंदखेडराजा शहरातील सर्व ओबीसी समाजातर्फे करण्यात येऊन सदर निवेदन मुख्यमंत्री यांचे नावे तहसीलदारामार्फत देण्यात आले. यावेळी हजारो ओबीसी प्रवर्गातील नागरिक, महिला, युवक मोर्चात सहभागी झाले होते.