सुपरह्युमन्सचा कारखानदार

>> अभिजित दिलीप पानसे  

प्रत्येकाला ‘हीरॉईजम’बद्दल मनात आवड, आकर्षण असतं. प्रत्येकाला कधीतरी मनात वाटत असतं की, आपण स्वतः सुपरहीरो असायला हवं होतं, आपल्याला ‘सुपरपॉवर्स’ मिळायला हवी किंवा खरंच कोणी सुपरहीरो वास्तवात यावा. सगळे संकट, अडचणी दूर कराव्यात, अन्यायग्रस्तांना न्याय मिळावा. स्टॅनली यांनी या मानवी संवेदना, आकांक्षाना साद घातली.  

सुहास शिरवळकर यांच्या ‘गढूळ’ या कादंबरीत लेखक असलेल्या नायकाला त्याने लिहिलेली पात्रे प्रत्यक्ष त्याला भेटतात आणि त्याला जाब विचारतात. आम्हाला का जन्मास घातले, आमचं पुढे काय होईल..आम्हाला मुक्ती कशी मिळेल…त्या अप्रतिम कादंबरीत ती पात्रे त्यांना जन्मास घातलेल्या लेखकावर नाराज असतात. स्टॅनली लायबर या सुपरहीरोंच्या जन्मदात्याच्या  लेखकाच्या मृत्यूसमयी किंवा ते जिवंत असताना त्यांच्या आयुष्यात जर असं काल्पनिक जग सत्यात उतरलं असतं तर स्टॅनलींवर मात्र त्यांनी निर्माण केलेली पात्रे कधीच नाराज नसतात. उलट स्पायडरमॅन, हल्क, थॉर, आयर्नमॅन आणि इतर ‘अतिमानव’ कायमस्वरूपी स्टॅनलींसाठी कृतज्ञ राहिले असते.

प्रत्येकाला ‘हीरॉईजम’बद्दल मनात आवड, आकर्षण असतं. प्रत्येकाला कधीतरी मनात वाटत असतं की, आपण स्वतः सुपरहीरो असायला हवं होतं, आपल्याला ‘सुपरपॉवर्स’ मिळायला हवी किंवा खरंच कोणी सुपरहीरो वास्तवात यावा. सगळे संकट, अडचणी दूर कराव्यात, अन्यायग्रस्तांना न्याय मिळावा. स्टॅनली यांनी या मानवी संवेदना, आकांक्षाना साद घातली. त्याला कुरवाळलं. लोकांना वास्तवापासून दूर नेऊन त्यांना वेगळ्या, लोकांना आवडेल अशा जगात नेलं. प्रतिसृष्टीच निर्माण केली. वाचकांना, प्रेक्षकांना तात्पुरत का होईना, पण आनंद दिला. अजूनही देताहेत.

त्यांनी स्पायडरमॅन, हल्क, अँट मॅन, आयर्न मॅन, डॉक्टर स्ट्रेंज आणि इतर प्रसिद्ध सुपरहीरोज दिलेत. विश्वामित्रांनी जशी प्रतिसृष्टी निर्माण केली होती म्हणतात तशी या स्टॅनली यांनी स्वतःची एक काल्पनिक प्रतिसृष्टी निर्माण केली, लोकांना त्यात रमवलं. ते एक मोठे ‘एंटटेनर’ होते. लोकांच्या आयुष्यात असलेल्या अडचणी, संकटे, वेदना काही क्षणासाठी विसरून त्यांचं मनोरंजन होऊन आनंद मिळावा ही स्टॅनलींची इच्छा होती. असं त्यांनी त्यांच्या बर्‍याच मुलाखतीत सांगितलं होतं.

डिसेंबर 1922 मध्ये अमेरिकेत मॅनहॅटन येथे गरीब घराण्यात जन्मलेल्या स्टॅनली लायबर यांना पुस्तके, साहित्य, चित्रपट, विनोद, थ्रिलर यांचं आकर्षण होतं. वयाच्या सतराव्या वर्षी ते टाइमली मॅगझीनमध्ये नोकरी करू लागले. मिस्टर गुडमन यांनी सुरू केलेलं टाइमली मॅगझिन हे 1939 साली सुरू झालेलं पहिलं मॅगझिन होतं. स्टॅनली यांना प्रथम तिथे अगदी क्षुल्लक कामे करावी लागत, जसं शाईच्या पेनात शाई घालणे, कागदपत्रे पोहचवणे. पण त्यांच्यातील कलागुण संपादकाला हळूहळू कळू लागले आणि स्टॅनली यांना प्रथम संधी मिळाली स्वतःचं कॉमिक पात्र लिहायची. त्यांनी प्रथम पात्र लिहिलं ते ‘डिस्ट्रॉयर’. हे मॅगझिन आणि हे सुपरहीरो पात्र लोकप्रिय झालं. यानंतरचा काळ विश्वमहायुद्धाचा होता. स्टॅनली यांनी अमेरिका आर्मीमध्येही नोकरी केली. त्यांना युद्धासबंधी लिखाण, महितीपत्रके लिहिण्याचं काम देण्यात आलं. जागतिक महायुद्ध संपल्यावर स्टॅनली पुन्हा टाईमली मॅगझिनमध्ये परत आले. या काळात टाईमली मॅगझिनचं नाव बदलून ते ‘ऍटलस’ मॅगझिन झालं. कॅप्टन अमेरिकासारखे सुपरहीरो वाचकांना मिळू लागले. 1950 सालपर्यंत स्टॅनली यांनी बरंच लिखाण केलं, पण त्यांना नंतर कंटाळा येऊ लागला होता. त्यांनी ऍटलस मॅगझिन सोडण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक व्यापारात एक तगडा प्रतिस्पर्धी असतोच, तसा टाइमली म्हणजेच ऍटलस मॅगझिनचंही एक कट्टर प्रतिस्पर्धी मासिक होतं ते डीएस मॅगझिन. 1950च्या काळात डीएस मासिकाने ऍटलस मासिकाला मागे टाकून मासिकाच्या व्यापारात स्वतःचं प्रस्थ स्थापन केलं. अश्यात स्टॅनली हे ऍटलस मासिकाला सोडणार तर अवस्था अजून बिकट होईल या भीतीने प्रमुख संपादकाने स्टॅनली यांना नोकरी सोडून जाण्यास रोखले. आणि त्यांना हवं तसे नव्याने काम करायला, नवे सुपरहीरोज निर्माण करण्याची जबाबदारी दिली. इथून गोष्टी बदल्यात. 1950या सालपर्यंत वाचक सुपरहीरो प्रकाराला काहीसे कंटाळले होते. एकसुरी आणि सर्वांगाने परिपूर्ण असलेले सुपरहीरो, त्यांच्या एकसुरी कहाण्या वाचक नाकारू लागले. इथून स्टॅनली लायबर यांनी सूत्रे स्वतःच्या हाती घेतली. त्यांनी सुपरहीरोजचं ‘मानवीकरण’ केलं. सुपरहीरोज हे परिपूर्ण न दाखवता त्यांच्यात मर्यादा दाखवल्या. त्यांनाही त्रास असू शकतो, ते ही अडचणीत येऊ शकतात, त्यांनाही आर्थिक तंगी असू शकते, त्यांनाही मृत्यूची भीती असू शकते. तेही प्रेयसी मिळवायला सामान्य माणसासारखा प्रयत्न करू शकतात. त्यांनाही अपयश येऊ शकतं. अश्याप्रकारे सुपरहीरोजचं रूपांतर त्यांनी ‘सुपरह्युमन्स’ मध्ये केलं. वाचकांना ही पात्रे प्रचंड पसंतीस पडली. वाचकांचं प्रेम परत मिळू लागलं. इथून जन्म झाला हल्क, स्पायडरमॅन, आयर्नमॅन, डॉक्टर स्ट्रेंज इ. सुपरह्युमन्सचा! दुसर्‍या महायुद्धानंतर शीतयुद्धाचा काळ होता. या काळात स्टॅनली यांनी आयर्नमॅन जो शस्त्रs तयार करून विकतो असं पात्र निर्माण करून जोखीम पत्करली होती.

याकाळात मासिकाचं नाव पुन्हा बदलून ‘मार्व्हल मॅगझिन’ झालं. मार्व्हल मॅगझिन हे वाचकांच्या पसंतीस उतरलं. जगप्रसिद्ध, लोकप्रिय झालं. 1999 मध्ये मार्व्हल मॅगझिन आणि डिस्ने यांच्यात व्यावसायिक संबंध स्थापित झाले. त्यानंतर मार्व्हल मॅगझिनने आणखी मोठं व्यावसायिक यश मिळवलं. स्टॅनली यांनी एक अट ठेवली होती की त्यांनी निर्माण केलेल्या मॅगझिनपैकी कोणत्याही पात्रावर चित्रपट बनवला गेला तर ते त्या सिनेमात एका दृश्याततरी काम करतील. त्यामुळे स्टॅनली त्यांच्या मानसपुत्रांच्या प्रत्येक सिनेमात असतातच. स्पायडरमॅन लायब्ररीत लढत असताना एक लायब्ररीयन कानाला हेडफोन लावून गाणे ऐकत असतो, तो लायब्ररीयन हे स्टॅनलीच.

स्टॅनली लायबर हे एक कारखानदार होते, त्यांचा कारखाना होता सुपरहीरो निर्माण करण्याचा. 12 नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला असता सर्व मानसपुत्रेही काल्पनिक जगतात अश्रू ढाळत असणार आपला जन्मदाता जग सोडून गेला यांसाठी. पण स्टॅनली यांनी दिलेले पात्रे हे जगाचं मनोरंजन कायम करत राहतील. हे ‘अवेंजर्स’ यानंतरही ‘इंफिनिटी’पर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहतील.

[email protected]