ठसा : सर व्ही.एस. नायपॉल

व्ही.एस.नायपॉल, साहित्यिक

सर्वोत्कृष्ट  इंग्रजी साहित्याच्या मांदियाळीत परदेशात जन्मलेल्या ज्या हिंदुस्थानी वंशाच्या साहित्यिकांचा समावेश आहे त्यात व्ही.एस. नायपॉल यांचा क्रम निश्चितच वरचा असेल. नायपॉल यांनी लिहिलेली पुस्तके, प्रवासवर्णने, कविता यांची गणना उच्च दर्जाच्या इंग्रजी साहित्यात होते. विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल असे त्यांचे पूर्ण नाव. जन्म वेस्ट इंडीजमधील त्रिनिदाद येथे 1932 सालचा. वडील जरी तेथील राज्य शासनात सनदी अधिकारी म्हणून कार्यरत असले तरी नायपॉल यांचे पूर्वज त्रिनिदाद येथे आले ते मजूर म्हणून. त्या काळात हिंदुस्थानातून कामगार म्हणून मोठ्या संख्येने लोकांना दक्षिण आफ्रिका, फिजी बेटे, कॅरेबियन द्वीपसमूह अशा अनेक ठिकाणी नेले गेले. व्ही. एस. नायपॉल यांचे पूर्वज असेच मजूर म्हणून कॅरॅबियन बेटांवर आणले गेले. बहुधा त्यामुळेच व्ही. एस. नायपॉल यांच्या साहित्यात स्थलांतरितांच्या भळभळणार्‍या जखमा, वेदना अत्यंत प्रखरपणे व्यक्त झाल्या. त्यांच्या साहित्यात त्रिनिदादपासून लंडनपर्यंतचा प्रवास, विविध देशांमधील स्थलांतरितांची दुःखे, मुस्लिम देशांमधील नागरिकांना शीतयुद्धामुळे भोगावे लागलेले परिणाम अशा अनेक गोष्टींचे प्रतिबिंब दिसते. प्रतिभेची देणगी आणि या सर्व वेदना जणू त्यांच्याच  उरीच्या असल्याने अधिक प्रभावीपणे त्या शब्दांत व्यक्त झाल्या आणि वाचकांच्या मनाला भिडल्या.

 ‘अ हाऊस फॉर मिस्टर बिस्वास’ ही 1961 च्या सुमारास त्यांनी लिहिलेली कादंबरी प्रचंड गाजली. कॅरॅबियन देशांमधील हिंदुस्थानी स्थलांतरितांची घुसमट, त्यांच्या वेदना त्यांनी या कादंबरीत तडफेने मांडल्या आहेत.  किंबहुना या कादंबरीमधील पेंटर ते पत्रकार म्हणून धडपडणारी आणि आपले कुटुंब उभे करण्याचे स्वप्न बाळगणारी मोहन बिस्वास ही मुख्य व्यक्तिरेखा म्हणजे व्ही. एस. नायपॉल यांच्या वडिलांचीच जीवनकहाणी होती. कॅरॅबियन द्वीपसमूहातील स्थलांतरितच नव्हे तर इराण, इराक, तुर्की, पाकिस्तान आदी मुस्लिम देशांची शीतयुद्ध आणि यादवी यामुळे जी दुर्दशा झाली तीदेखील त्यांच्या साहित्यातून प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. या देशांतील  राजकीय अस्थिरतेच्या काळात नायपॉल यांनी तेथे भेटी दिल्या. प्रवास केला. त्यामुळे तेथील दुर्दशेचा ‘आँखो देखा हाल’, त्या देशांच्या नागरिकांची दुरवस्था त्यांनी आपल्या संवेदनशील शैलीत मांडली आणि प्रभावीपणे जगासमोर आणली. विद्याधर नायपॉल यांचे वडील सूरजप्रसाद यांचीदेखील लेखक होण्याची आंतरिक इच्छा होती. त्यांना साहित्यात अभिरुची होती. त्यांनी काही पुस्तकेही लिहिलीत. ‘त्रिनिदाद गार्डियन’ या स्थानिक वृत्तपत्रात ते लिखाण करीत असत. ‘अ प्रोलॉग टू ऍन ऑटोग्राफी’ या पुस्तकात व्ही.एस. नायपॉल यांनी आपल्या वडिलांची साहित्यविषयक रुची, साहित्यिक वर्तुळ, लेखक होण्याची अभिलाषा याविषयी लिहिले आहे.

दुर्दैवाने सूरजप्रसाद यांना लेखक म्हणून तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र विद्याधर आणि शिवा या दोन्ही मुलांनी प्रतिभावान साहित्यिक म्हणून जागतिक साहित्यात झेंडा फडकविला आणि त्यांचे अपूर्ण स्वप्न वेगळ्या अर्थाने पूर्ण केले. त्यातही विद्याधर नायपॉल हे विश्वविख्यात साहित्यिक म्हणून नावारूपाला आले. दुर्दैवाने आपल्या मुलांचे हे यश पाहण्याआधीच म्हणजे 1953 मध्ये त्यांचे निधन झाले. स्वतः विद्याधर नायपॉल हेसुद्धा कधीकाळी लिखाणाच्या बाबतीत नैराश्याने ग्रासले होते. मात्र त्यावेळची त्यांची महाविद्यालयीन मैत्रीण पॅट्रिका ऍन हेल हिच्या प्रोत्साहनाने आणि मदतीने ते या नैराश्यातून बाहेर आले. पॅट्रिका हीच त्यांची नंतर जीवनसाथी बनली. शिष्यवृत्तीच्या आधारे ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी आलेले नायपॉल पदवी मिळाल्यावर लंडन येथेच स्थायिक झाले. तेथेच त्यांनी शनिवारी (11 ऑगस्ट) शेवटचा श्वास घेतला. व्ही.एस नायपॉल यांचे साहित्य फुलले ते लंडनमध्येच. ‘सर’ ही ब्रिटनमधील मानाची पदवी 1990 मध्ये इंग्लंडच्या राणी  एलिझाबेथ यांनी नायपॉल यांना बहाल केली. परखड समीक्षक असलेला हा प्रतिभावान साहित्यिक उत्कृष्ट कादंबरीकार, कवी, नर्म विनोदी लेखक, चित्रकार अशा भूमिकांमधूनही जगासमोर आला. त्यांच्या परखड, टोकाच्या भूमिकांमुळे ते कायम वादग्रस्तदेखील राहिले. जन्मभूमी असलेल्या त्रिनिदादमध्येही त्यांच्यावर वांशिक द्वेषाचा शिक्का मारण्यात आला.

मुस्लिमांविषयी त्यांच्या काही भूमिकादेखील वादाच्या भोवर्‍यात सापडल्या. मायभूमी असलेल्या हिंदुस्थानला तीन वेळा भेट देणार्‍या नायपॉल यांच्या समीक्षेच्या तडाख्यातून हिंदुस्थानही सुटला नाही. अर्थात वाद-वादळांच्या भोवर्‍यात कायम राहिले म्हणून व्ही. एस. नायपॉल कधी नरमले नाहीत की वरमले नाहीत. ‘जो वाद निर्माण करीत नाही तो लेखक नाहीच’ असे त्यांनीच एकदा म्हटले होते. जागतिक साहित्य वर्तुळात आपल्या प्रतिभेच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण करणार्‍या, बुकर पुरस्कार, सर्वोच्च असा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळविणार्‍या व्ही. एस. नायपॉल या नावाभोवती कायम पिंगा घालणार्‍या वादविवादाचे ‘कूळ’ आणि ‘मूळ’ बहुधा त्यांच्याच या धारणेमध्ये असावे. जागतिक साहित्यात तीसपेक्षा अधिक साहित्यकृती लिहून घोंघावणारे, स्वतःच्या नावाचा दरारा निर्माण करणारे ‘सर व्ही. एस. नायपॉल’ हे वादळ आता वयाच्या 85 व्या वषीं कायमचे शांत झाले आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्यानंतर साहित्यातील नोबेल मिळविणारे एकमेव मूळ हिंदुस्थानी वंशाचे साहित्यिक म्हणूनही त्यांची आठवण कायम राहील.