पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ‘इंद्रियसुखा’चे धडे, विनोद तावडेंचा आणखी एक प्रताप

203

सामना ऑनलाईन । मुंबई

विनोद तावडे यांचे शिक्षण खाते नेहमीच चर्चेत राहिले आहे. कधी शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे तर कधी पंतप्रधान मोदींवरील पुस्तकामुळे. आता हे कमी म्हणून की काय शिक्षण खात्याचा आणखी एक प्रताप उजेडात आला आहे. अवांतर आणि पूरक वाचनाच्या नावाखाली पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना चक्क ‘इंद्रियसुखा’चे धडे दिले आहेत. ‘बाल नचिकेत’ नावाच्या या पुस्तकात ‘मीलन, कामातुर आणि कौमार्यभंग’ अशा शब्दप्रसंगांचा सुळसुळाटच आहे. या शिकवणीमुळे बिचारे विद्यार्थी तर हैराण आहेतच, पण शिक्षकही परेशान आहेत. पालकांच्या संतापाचा तर कडेलोटच झाला आहे!

विद्यार्थ्यांना शाळेच्या क्रमिक पुस्तकांबरोबरच ‘पूरक वाचना’साठी शालेय शिक्षण विभागाकडून अवांतर वाचनासाठी पुस्तके दिली जातात. यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा असा हेतू असतो. मात्र विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या ‘बाल नचिकेत’ पुस्तकातील अश्लील शब्दांमुळे सरकार विद्यार्थ्यांचा कुठला विकास करू पाहत आहे, असा प्रश्न पालक विचारत आहेत. विशेष म्हणजे ‘भारती विचार संस्थे’कडून २० रुपयांना मिळालेले हे पुस्तक विद्यार्थ्यांना ५० रुपये घेऊन माथी मारण्यात येणार आहेत. शिक्षण विभागाच्या या हलगर्जी कारभाराविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

‘असले’ ज्ञान काय कामाचे?
स्वभाव गुणधर्मानुसार लहान मुलांमध्ये अशा लैंगिक शब्दांमुळे कुतूहल वाढून त्यांची आपापसात चर्चा वाढेल. यातून नाहक वेगळे परिणामही दिसू शकतात. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनाची गरज असते हे जरी खरे असले तरी ‘असले’ ज्ञान काय कामाचे, असा सवाल पालक-शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा अरुंधती चव्हाण यांनी केला आहे.

लहान मुलांच्या वाचनात अशी पुस्तके आली तर त्यांच्यासमोर यातील अश्लील शब्दांबाबत प्रश्न निर्माण होणार आहेत. या मुलांनी जर या शब्दांच्या अर्थाचे स्पष्टीकरण मागितले तर त्यांना काय उत्तर देणार हा प्रश्न आहे. त्यामुळे ज्या कमिटीने पुस्तके मंजूर केली त्यांनी स्वतः वाचली की नाहीत हा संशोधनाचा विषय आहे.
– प्रशांत रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना

‘बाल नचिकेत’मध्ये आक्षेपार्ह काय…

‘माझे कौमार्यभंग झाल्याने मला कोण स्वीकारेल?’
‘रात्रसदृश गहन व दाट धुक्यात त्यांचे मीलन झाले’
‘विवाह करूनही विषयलोलुपता आणि इंद्रियसुख दूर ठेवता येते…’
तिचे सौंदर्य, नितळ कांती, शरीराच्या होणाऱया हालचाली पाहून पराशर ऋषींचे चित्त चंचल झाले.
त्यांच्यात कामवासनेचा प्रादुर्भाव झाला. त्यांनी कामातुर होऊन तिचा हात पकडला.
‘देवी! नग्न होऊन तू आम्हास भोजन द्यावे!’

आपली प्रतिक्रिया द्या