मालवण समुद्रात सापडला ओशन सन फिश

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या गुरूवारी सकाळी ओशन सन फिश जातीचा मासा सापडला. ओशन सन फिश हा जास्त करून बालीबेट (इंडोनेशिया)च्या आसपास आढळतो. असे असताना हा मासा हजारो मैलाचा प्रवास करत मालवणच्या समुद्रात आढळून आला आहे. प्रथमच आशाप्रकारचा मासा मालवणच्या किनारपट्टीवर सापडल्यामुळे कुतूहल निर्माण झाले होते. अनेकांना या माशाचा फोटो निसर्गप्रेमींना पाठवून माहीती घेतली. मालवण बंदरात लिलावासाठी आलेला हा मासा पाहण्यासाठी पर्यटक आणि शहरवासियांची गर्दी झाली होती. दरम्यान मालवणमध्ये सापडलेल्या माशाची लांबी चार ते पाच फूट होती. तसेच आकार लहान होता. त्यामुळे हे पिल्लू असल्याची शक्यता निसर्गप्रेमी कुडाळकर यांनी व्यक्त केली आहे.

या माशाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी निसर्गप्रेमी कुडाळकर यांच्याशी संपर्क साधला असता, हा मासा ओशन सन फिश किंवा मोलामोला म्हणजे जगातील सर्वात मोठा हाडे असलेला मासा आहे, असे सांगितले. याचे वजन अडिच टनापर्यंत असू शकते. लांबी दहा ते अकरा फुटापर्यंत असते. हा दिवसा समुद्राच्या उबदार पाण्यावर तरंगताना दिसतो. त्याचा आकार काहीसा गोल आणि रंग चंदरी असल्यामुळे त्याला सन फिश म्हणतात. त्याचे खाद्य जास्त करून जेलीफिश आणि प्लॅक्टंन आहे. त्याची हालचाल मंद असते परंतु प्रसंगी तो वेगवान हालचाली करू शकतो. सन फिश हा जगातील कोणत्याही पृष्ठवंशीय प्राण्यापेक्षा जास्त अंडी एकाचवेळी घालतो. तो एकाचवेळी तीन कोटी अंडी घालतो. त्याच्या अंगावर चाळीस प्रकारच्या परजीवी आढळतात.

कोकण किनारपट्टीवर सद्यस्थितीत जेलीफिश मोठ्या प्रमाणावर आल्याने हा मासा किनारपट्टीवर आल्याची प्राथमिक शक्यता निसर्गप्रेमी चंद्रवदन कुडाळकर यांनी वर्तवली आहे.