ऑक्टोबर हीटमुळे शेतकरी त्रस्त, थंड हवेचे ठिकाण तापले

1

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यात मागील वीस ते बावीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र कोरडे व अंशतः ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील तापमानामध्ये वाढ झाली आहे.

थंड हवेच्या बुलढाणा शहराचे तापमान चक्क ३५ अंश सेल्सियसवर तर इतर तालुक्यांतील तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे पावसाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये नागरिकांसह शेतकऱ्यांना मार्च हीटचा अनुभव येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, प्रत्येक जण परतीच्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे.

जिल्ह्याचे पर्जन्यमान ८६८१ मिमी असून त्याची सरासरी ६६७.८ आहे. परंतु यंदा जिल्ह्यात ११ ऑक्टोबरपर्यंत सरासरी ४६५.८ पावसाची नोंद करण्यात आली आहे. उपरोक्त आकडेवारी पाहता यावर्षी जिल्ह्यात सरासरी २००.२ मि. मी. पाऊस कमी पडला आहे. मागील आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यात परतीचा पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. परंतु हा अंदाज निसर्गाने तंतोतंत चुकीचा ठरविला आहे. त्यातच मागील वीस ते बावीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र कोरडे वातावरण तयार झाले आहे. त्यातच कधी नव्हे ऑक्टोबर महिन्यातच सूर्य आग ओकत आहे. या उन्हाचा सोयाबीनसह इतर पिकांना फटका बसला आहे. तळपत्या उन्हामुळे सोयाबीन फुटून त्यातील दाणे खाली पडत आहेत. तर शेकडो हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला सुकत आहे. परिणामी शेतकऱ्यांना पिकांना वाचवण्यासाठी पाणी द्यावे लागत आहे. वास्तविक पाहता सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यापासून कडक हिवाळ्याला सुरुवात होते. परंतु याच महिन्यात कडक उन्ह तापत असल्यामुळे ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी घरातील पंखे लावावे लागत आहे. पावसाची उघडीप व कोरड्या हवामानामुळे जिल्ह्यातील तापमानात सतत वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्यात २५ ते २६ अंशाच्या जवळपास असलेले तापमान सध्या ३५ ते ४० अंश सेल्सियसपर्यंत जाऊन पोहोचले आहे.