दिल्लीत पुन्हा कारसाठी ‘सम-विषम’ची योजना

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीत घातक प्रदूषण निर्माण झाल्याने राजधानीत १३ नोव्हेंबरपासून पाच दिवसांसाठी कारसाठी सम-विषम ही योजना लागू केली जाणार आहे. यामधून सीएनजी कार, महिला चालक असलेल्या कार आणि दुचाकींना सूट दिली आहे. ही योजना लायसन्स प्लेटवरील शेवटच्या क्रमांकावर आधारित आहे. यानुसार सम तारखेला सम प्लेट नंबरच्या कार तर विषम तारखेला विषम नंबर प्लेटच्या कार दिल्लीत धावतील. दिल्लीत प्रदूषणामुळे शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. शिवाय बांधकामांवर बंदी घातलेली आहे. दरम्यान, हवेतील धूळ आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याच्या उपायाचाही विचार करा असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिले आहेत. ढगांवर विमानातून विशिष्ट रसायनांचा मारा करून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या उपायासह इतर उपायांचा विचार करा आणि दिल्ली प्रदूषणमुक्त करा असे कोर्टाने म्हटले आहे.