मुंबईच्या पहिल्या दिवशी २६४ धावा

सामना ऑनलाईन । भुवनेश्वर

यजमान ओडिशाने बुधवारपासून येथे सुरू झालेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील ‘क’ गटाच्या लढतीत बलाढय़ मुंबईला पहिल्या दिवशी ६ बाद २६४ धावांवर रोखले. पृथ्वी शॉच्या धडाकेबाज १०५ धावा आणि त्याने अजिंक्य रहाणेसोबत (४९ धावा) केलेली १३६ धावांची भागीदारी मुंबईच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले.

बसंत मोहांतीने अखिल हेरवाडकरला १४ धावांवर बाद करीत मुंबईला २० धावांवर पहिला धक्का दिला. त्यानंतर युवा स्टार पृथ्वी शॉ व हिंदुस्थानी संघाचा आधारस्तंभ अजिंक्य रहाणे या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची दमदार भागीदारी करीत मुंबईच्या डावाला आकार दिला. पृथ्वी शॉने या मोसमातील दुसरे शतक झळकावताना ओडिशाच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने १५३ चेंडूंत १८ चौकारांनिशी १०५ धावांची खेळी साकारली. बसंत मोहांतीनेच त्याला पायचीत पकडले आणि जोडी फोडली. मुंबईच्या संघामध्ये पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेनेही चांगली खेळी साकारली, मात्र त्याला अर्धशतकी खेळी करता आली नाही. त्याला सूर्यकांत प्रधानने ४९ धावांवर बाद केले.

महाराष्ट्राचा डाव २४५ धावांमध्येच गारद
कर्नाटकचा कर्णधार विनयकुमार याने केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर कर्नाटकने आजपासून पुण्यात सुरू झालेल्या रणजी स्पर्धेतील ‘अ’ गटातील लढतीत महाराष्ट्राचा पहिला डाव २४५ धावांमध्ये गुंडाळला. राहुल त्रिपाठीच्या १२० धावा व नौशाद शेखच्या ६९ धावांमुळे महाराष्ट्राला दोनशेच्यावर धावा करता आला. विनयकुमारने ५९ धावा देत ६ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.