रेल्वेचा डबा नाही, हा तर शाळेचा वर्ग! ओडिशातल्या शाळेची चर्चा

12

सामना ऑनलाईन । भुवनेश्वर

ओडिशाच्या मलकानगिरी या भागात शिकणारी सर्व आदिवासी मुलं हल्ली आनंदाने शाळेत जातात. कारण, त्यांची शाळा एका रेल्वेच्या रुपात त्यांच्या गावात अवतरली आहे. यापूर्वीच्या आयुष्यात रेल्वे प्रत्यक्षात दिसते तरी कशी, हे कधीच न पाहिलेले विद्यार्थी शाळेच्या या प्रयोगामुळे भलतेच खुश आहेत.

मलकानगिरी हा परिसर ओडिशातील एक अतिदुर्गम, नक्षलग्रस्त प्रदेश आहे. त्यामुळे तिथे अद्यापही रेल्वे सुविधा पोहोचलेली नाही. त्यामुळे इथे राहणाऱ्या अनेक मुलांनी आजवर रेल्वे प्रत्यक्षात दिसते कशी, हेही पाहिलेलं नाही. मुलांची ही जिज्ञासा शमवण्यासाठी आणि शाळेतील शिक्षणात गोडी वाढवण्यासाठी येथील चित्रकोंडा परिसरात असलेल्या नोडाल अप्पर प्रायमरी शाळेनेच पुढाकार घेतला. सरकारी शाळांना मिळणाऱ्या बिल्डिंग अॅज लर्निंग एड (बाला) या निधीच्या माध्यमातून या शाळेने आपली इमारत रेल्वेच्या बोगींप्रमाणे रंगवून घेण्याचं निश्चित केलं. २० ऑगस्ट रोजी या इमारतीच्या नुतनीकरणाचं काम पूर्ण झालं आणि रेल्वे रुपातली शाळा त्यांच्या भेटीला आली. त्यामुळे ही शाळा इथल्या परिसरात आकर्षणाचा विषय ठरली आहे. या शाळेने या त्यांच्या रेल्वेचं नाव मल्यबन्ता एक्सप्रेस असं ठेवलं आहे. मल्यबन्ता या शब्दाचा संदर्भ ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश येथे विस्तृत पसरलेल्या आदिवासी पट्ट्याशी संबंधित आहे. त्यामुळे शाळेने त्यांच्या रेल्वेरुपातल्या इमारतीला हे नाव ठेवलं आहे.

या शाळेत सध्या ६२० विद्यार्थी असून १३ शिक्षक या शाळेत शिकवतात. निळ्या रंगात रंगलेल्या या बोगींना पाहून विद्यार्थी सध्या भलतेच खुशीत आहेत. त्यातील काहींनी चित्रपटात रेल्वे पाहिली आहे. मात्र, प्रत्यक्षात ती अशी दिसते, हे त्यांना आता अनुभवता येत आहे. या शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश चंद्र नायक यांना शाळेतील मुलांसाठी काहीतरी नवीन गोष्ट करायची होती. त्यामुळे त्यांनी ही अभिनव कल्पना राबवल्याचं नायक यांचं म्हणणं आहे. या रेल्वेच्या आकर्षणामुळे विद्यार्थ्यांची शाळेची गोडी अजून वाढली असून आता त्यांना रुळांवर धावणारी खरीखुरी रेल्वे बघायची उत्सुकता लागल्याची माहिती नायक यांनी दिली आहे.

summary- odisha school has a railway alike exterior

आपली प्रतिक्रिया द्या