भैय्या देशमुख खंडणी प्रकरणाला नवे वळण; परस्परविरोधी तक्रार दाखल

सामना ऑनलाईन, पंढरपूर

जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भैय्या देशमुख यांनी खंडणी मागितल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागलंय. देशमुख यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होण्याच्या काही तास आधी भैय्या देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी विजया कोळी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. देशमुख यांनी ७२ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार विजया कोळी यांनी केली होती. आता या परस्परविरोधी तक्रारीनंतर पंढरपूर शहर पोलिसांनी भैय्या देशमुख यांच्यासह त्यांचे दोन कार्यकर्ते सचिन कारंडे आणि अनिल झुंझार यांना अटक केली आहे तर विजया कोळी यांचा शोध सुरु आहे.

पाच वर्षांपूर्वी दुष्काळाशी झुंजणाऱ्या सोलापूर भागातील भैय्या देशमुखांनी आझाद मैदान इथे पाण्यासाठी आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धारणात पाणी नाही तर आता काय मुतायचं का ? असं वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचा भडका उडाला होता.

भैय्या देशमुख यांचं खरं नाव प्रभाकर देशमुख असं असून ते जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. पंढरपुरातील विजया कोळी आणि त्यांचे पती तुकाराम कोळी या दोघांवर पैशांचा पाऊस पाडण्याचं आमीष दाखवत लोकांना लुबाडल्याचा आरोप आहे. या दोघांनी त्यांच्याविरोधातील प्रकरण मिटवण्यासाठी देशमुखांनी आपल्याकडे ७२ लाख रूपये मागितल्याचा आरोप विजया कोळी यांनी केला आहे. त्यांनीच देशमुख यांच्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

कोळी दांपत्याच्या विरोधात देशमुख यांनी मोहीम उघडली होती. त्यांनी या दोघांवर एक पत्रकार परिषद घेऊन लोकांना फसवल्याचा आरोप लावत कारवाईची मागणी केली होती. पत्रकार परिषदेनंतर देशमुख यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप कोळी दांपत्याने केला आहे.