दुचाकी अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न ; सात जणांवर गुन्हा

53

सामना प्रतिनिधी । गंगाखेड

भांडण सोडविल्याच्या कारणावरून दुचाकी अडवून एकावर जीवघेणा हल्ला केल्यावरून आज ११ मे रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोर्डा येथील नामदेव पंडीतराव मुंडे (३२) हा युवक सोमवार, ७ रोजी रात्री ८:३०च्या सुमारास गंगाखेड येथुन दुचाकीवरून घराकडे जाण्यासाठी निघाला. यावेळी शहरातील दत्त मंदीर परीसरात त्याची गाडी नारायण बालाजी मुंडे याने अडवली आणि माझे व ज्ञानोबा लटपटे यांचे भांडण का सोडविले, असे विचारत त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर अंधारात दबा धरून बसलेल्या अंगद बालाजी मुंडे, बालाजी मुंडे, बंडू विनायक नागरगोजे, दीपक नागरगोजे यांनी नामदेवला मारहाण करून गंभीर जखमी केले.

परभणी येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू घेतांना नामदेव याने या हल्याची माहिती पोलिसांना देत हल्लेखारांविरोधात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बहुरे, पोलीस शिपाई ओम वाघ हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या