दाऊदच्या भावाच्या मागे आता ईडीचा ससेमिरा

सामना प्रतिनिधी, मुंबई

बिल्डरला खंडणीसाठी धमकाविल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी अटक केलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याच्यामागे आता ईडीचा ससेमिरा सुरू झाला आहे. इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांविरोधात ईडीने मनी लॉण्डरिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

इक्बाल कासकर आणि त्याच्या दोन साथीदारांना ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथककाने नुकतीच अटक केली. खंडणी तसेच इतर गैरमार्गाने इक्बालने बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा संशय आहे. इतकेच नाही तर हा पैसा त्याने परदेशात गुंतविल्याचे म्हटले जात आहे. याचाच तपास करण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी इक्बाल कासकर आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला. मनी लॉण्डरिंग कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून यात इक्बालला अटक झाली तर जामीन मिळणे मुश्कील असल्याचे म्हटले जात आहे.