श्री अंबाबाईला घागराचोळी अर्पण करणाऱ्या भाविकासह श्रीपूजकांवर गुन्हा दाखल

39

सामना ऑनलाईन, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी एकीकडे भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि श्रीपूजकांच्या वादामुळे भाविक संभ्रमावस्थेत आहेत. रासायनिक संवर्धनाच्या कामाबाबत गेल्याच आठवड्यात झालेला वाद शमतो न शमतो तोच वटपौर्णिमेदिवशी देवीला दररोजच्या पारंपरिक वस्त्राऐवजी घागराचोळी परिधान करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे दुर्लक्ष आणि श्रीपूजकांच्या मनमानीमुळे एका भाविकाने दिलेल्या तक्रारीनुसार देवीला हे वस्त्र अर्पण करणाऱया भाविकासह दोन श्रीपूजकांवरही जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

अजित ठाणेकर, बाबूराव ठाणेकर या श्रीपूजकांसह योगेश जोशी  या वस्त्र अर्पण करणाऱ्या भाविकावर गुन्हा दाखल झाला आहे. दिलीप पाटील या भाविकाने तक्रार केली. देवीला नेहमी काठपदर असलेली शालू आदी पारंपरिक साडी परिधान करण्यात येते, मात्र देवीला पारंपरिक वस्त्र परिधान करण्याऐवजी चक्क घागराचोळी परिधान करण्यात आली होती.

भावना दुखावल्या नाहीत-श्रीपूजकांचा दावा

राजस्थानातील ‘खोडीयार माता’ देवीच्या पार्श्वभूमीवर ही पूजा बांधण्यात आली असून राजस्थानी घागरा हा सलवारकमीज, पंजाबी चुडीदार नसून गोल शिवलेली एकप्रकारची साडीच आहे. देशाच्या संस्कृतीतीलच व लाखो माताभगिनींचाही नित्याचा हा पोषाख असून त्यामध्ये आदिशक्ती जगदंबेची पूजा बांधणे यात काहीच गैर नाही. यातून कोणाचीही भावना दुखावण्यात आली नसल्याचा दावा श्रीपूजक मंडळाने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या