ठाणे पोलीस शोधणार ‘चप्पल चोर’; तरुणाच्या शूज चोरीप्रकरणी गुन्हा

सामना प्रतिनिधी । ठाणे

कुठे सोनसाखळी चोर… तर कुठे दरोडेखोर, बाईक चोर, बलात्कारी, घोटाळेबाज आहेतच… या नामचीन गुन्हेगारांचा शोध घेत असतानाच ठाणे पोलिसांसमोर आता ‘चप्पल चोर’ शोधण्याचे आव्हान आहे. कारण डोंबिवली पूर्वेत एका तरुणाचा बूट चोरल्याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांनी चप्पल, बुटांनाही लॉक लावून ठेवण्याची वळ आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

दिवा आगासन येथील मातोश्री बिल्डिंगमध्ये मोहीत सिंग (21) राहतो. काही कामानिमित्ताने मोहित डोंबिवली आगरकर रोडवरील जय श्री राम कृपा इमारतीत गेला होता. यावेळी त्याने त्याच्या पायातील पुमा कंपनीचे पांढऱ्या रंगाचे बूट बाहेर काढून ठेवले होते. मात्र काही वेळाने घराबाहेर आलेल्या मोहितला त्याचे बूट दाराबाहेर सापडले नाहीत. त्याने इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर जाऊन तीन हजार 200 रुपये किमतीच्या या बुटांची शोधाशोध केली. अखेर मोहितने याप्रकरणी पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला.