विधवा असून टिकली लावली म्हणून महिलेला पेंशन नाकारले

फोटो - प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । चेन्नई

सरकारी कार्यालयातील कामकाजाबद्दल नेहमीच अनेक तक्रारी कानावर येत असतात. अनेकदा तर मुद्दाम कामे रखडवून ठेवल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशातच तामिळनाडूमध्ये एका ७७ वर्षीय विधवा महिलेला पेंशन देण्यास एका सरकारी अधिकाऱ्याने नकार दिला. याबाबत विचारणा केली असता, महिला विधवा आहे तरीसुध्दा ती टिकली कशी लावू शकते, असा सवाल उपस्थित करत या सरकारी अधिकाऱ्याने महिलेला पेंशन नाकारली.

या वृद्ध महिलेच्या सुनेने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्या दोघी पेंशन घेण्यासाठी ऑफीसमध्ये गेल्या त्यावेळी संबंधित अधिकारी झोपा काढत होता. त्यांनी अधिकाऱ्याला झोपेतून जागे करत पेंशन मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे दिली. परंतु महिला विधवा असून तिने टिकली लावल्याचे सांगत त्या अधिकाऱ्याने त्या महिलेला पेंशन देणे नाकारले. तसेच विधवा स्त्रियांनी टिकली न लावता आपल्या कपाळावर पतीच्या चितेची राख लावली पाहिजे, असे सांगितले. वृद्ध महिलेच्या घरच्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनीही अधिकाऱ्याचीच बाजू घेतली. या महिलचे पती इलेक्ट्रिकल आणि मॅकेनिकल विभागात काम करत होते.