पेट्रोल पंपावरील हेराफेरीसाठी ऑइल कंपन्यांना जबाबदार धरणार

सामना प्रतिनिधी, मुंबई

पेट्रोल पंपांच्या युनिटमध्ये छेडछाड करून सर्वसामान्य नागरिकांना लुटले जाते. कधी कमी पेट्रोल दिले जाते तर कधी पेट्रोलमध्ये भेसळ केली जाते. मात्र या घटनांना लगाम घालण्यासाठी पेट्रोल भरण्याच्या यंत्रामध्ये पल्सर बसविले जाणार आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल पंपांचे ऑडिट डिलर, ऑइल कंपनी आणि डिस्पेन्सिंग युनिट बनविणारे प्रतिनिधी यांच्याकडून केले जाणार असून तरीही पेट्रोल पंपांवर हेराफेरी आढळल्यास यासाठी डीलरसोबतच पेट्रोल कंपन्यांनाही जबाबदार धरले जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

पेट्रोल पंपांकरील मशीनमध्ये छेडछाड करून सर्कसामान्यांना लुटण्याच्या घटना ठाणे तसेच राज्यात इतरत्र नुकत्याच उघडकीस आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वैधनमापन विभागाने उच्चस्तरा वर या घटनांचा आढावा घेतला असून त्यावरील उपाययोजना केल्या आहेत. अशा प्रकारच्या उपाययोजना करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचे गिरीश बापट म्हणाले.

पेट्रोल पंपाकरील मशीनचे कॅलीब्रेशन करून त्यावर स्टँपिंग करण्यात येते. आता अशा मशीनच्या सॉफ्टवेअर व हार्डवेअरची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचा ऑडिट रिपोर्टही करण्यात येईल. तेल कंपन्यांकरील जबाबदारीदेखील आता निश्चित करण्यात आली आहे.

यापूर्वी पेट्रोल पंपांवर पत्र्याच्या मोजमापातून पेट्रोल किंवा डिझेल मोजण्याची पद्धत होती, मात्र आता या पद्धतीत काही वेळा चुकीचे मापन होऊ शकते. म्हणून आता काचेच्या मापातूनच मोजमाप करण्यात येणार असल्याचे बापट म्हणाले.