२२ हिंदुस्थानी खलाशी असलेले इंधनवाहू जहाज बेपत्ता

सामना ऑनलाईन। पनामा

आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरून इंधनवाहू व्यापारी जहाज बेपत्ता झाले आहे. या जहाजात २२ हिंदुस्थानी खलाशी आहेत. हे जहाज बेपत्ता होऊन ४८ तासांपेक्षा अधिक काळ लोटल्याने जहाजाचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या जहाजात १३,५०० टन पेट्रोल असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे मूल्य ८.१ मिलियन डॉलर आहे. मुंबईतील अँग्लो ईस्टर्न शिपिंग कंपनीच्या मालकीचे हे जहाज आहे.

जहाज मालकांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी संध्याकाळी ५.३० नंतर जहाजाचा कंपनीशी संपर्क तुटला. जहाज बेपत्ता झाल्याचे कळल्यानंतर कंपनीने ट्वीट केले असून यात बेपत्ता खलाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही कंपनीची प्राथमिकता असल्याचे म्हटले आहे. तसेच जहाजाच्या मालकांनी जहाजाचा शोध घेण्यासाठी मुंबई शिपींग महासंचालनालयाची मदत मागितली आहे.

बेपत्ता होण्याआधी हे जहाज बेनिनच्या कोटोनाऊ येथे दिसल्याचं चीफ सर्व्हेअर आणि शिपींग महासंचालक, मुंबईचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे बी. आर. शेखर यांनी सांगितलं आहे. तसेच ‘एमटी मरिन एक्सप्रेस या जहाजाच्या मालकांचा १ फेब्रुवारीलाच जहाजाशी संपर्क तुटल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बेपत्ता जहाजाचा शोध घेण्यासाठी हिंदुस्थानने नायजेरिया व बेनिनच्या नौदलाकडे मदत मागितली आहे.

अपहरण झाल्याची शक्यता खरी ठरल्यास गेल्या दोन महिन्यांत जहाजाचे अपहरण होण्याची ही दुसरी घटना ठरू शकते. जानेवारी महिन्यातही अशीच एक घटना घडली होती. ज्यात एमटी बॅरेट नावाच्या जहाजाचे बेनिन किनाऱ्यावरून अपहरण करण्यात आले होते. त्यातही अनेक हिंदुस्थानी कर्मचारी होते. अपहरणकर्त्यांना खंडणी दिल्यानंतर सगळ्यांची सुटका करण्यात आली होती.