अवकाळी पावसाच्या फटक्याने द्राक्ष निर्यात मंदावली

सामना ऑनलाईन । नाशिक

ऑक्टोबरमधील परतीचा पाऊस आणि त्यानंतर मागील आठवडय़ातील अवकाळी पावसामुळे नाशिक जिह्यातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, कसमादेतील अर्ली सिजनची द्राक्ष निर्यात मंदावली आहे. या हंगामात आतापर्यंत ७३, तर गेल्या आठवडाभरात अवघे दोनच कंटेनर रवाना झाले आहेत.

द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राचा देशातील एकूण उत्पादनात ८१.२२ टक्के वाटा आहे, तर राज्यात नाशिक आघाडीवर आहे. यावर्षी जिह्यातील बागांचे क्षेत्र ५४ हजार ५४० हेक्टर आहे, आतापर्यंत निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणाऱया २४ हजार ३५५ प्लॉटस्ची कृषी विभागाकडे नोंद झाली आहे, हे क्षेत्र १५ हजार ५९० हेक्टर आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या व दुसऱया आठवडय़ातील परतीच्या पावसाने जिह्यातील द्राक्षबागा संकटात सापडल्या. कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यात तयार निर्यातक्षम द्राक्षघडांचे मोठे नुकसान झाले, यामुळे निर्यात मंदावली, तसेच उशीराने म्हणजे ६ नोव्हेंबरला निर्यात सुरु झाली. त्यानंतर मागील आठवडय़ात सोमवारी, मंगळवारी अवकाळी पावसाच्या दणक्याने बागांचे आणखी नुकसान झाले, द्राक्षमण्यांना तडे गेले असून फळकुजीचे संकट ओढावले आहे. परिणामी, या आठवडय़ात दोन कंटेनर निर्यात झाली. ती ८ ते १० कंटेनर इतकी अपेक्षित असते.

निर्यातीत ९ टक्के घट

या हंगामात आतापर्यंत ७३ कंटेनरने १ हजार ३१८ मेट्रीक टन द्राक्ष निर्यात झाली आहे, त्यातील ७२ कंटेनर रशियात, तर एक कंटेनर श्रीलंकेत गेला आहे. मागील वर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत तब्बल ८० कंटेनर रवाना झाले होते, ते पाहता निर्यातीत नऊ टक्के घट जाणवत आहे. मागील वर्षी सन २०१६-१७ मध्ये जिह्यातून एकूण ८ हजार ५९६ कंटेनरने १ लाख ३१ हजार ९८० मेट्रीक टन निर्यात झाली होती. त्यात नेदरलॅण्ड, रशिया, जर्मनी, यू.के.सह युरोपीयन वीस देश, तसेच आखाती देशांचा समावेश होता. यंदा अस्मानी संकटामुळे निर्यातीवर परिणाम होणार असल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत.