ओला कॅब चालकाकडून लॉच्या विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न, चालकाला अटक

पुणे – मूळची मुंबईकर असणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थीनीचे अपहण करण्याचा अयशस्वी प्रयत्न पुण्यात घडला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ओला कॅब चालक संतोष ज्ञानदेव तुपेरे (वय ३०, रा. दीनदयाळ रुग्णालयामागे, फर्ग्युसन रस्ता) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळची मुंबईकर असणारी २३ वर्षीय विद्यार्थीनी पुण्यात डेक्कन परिसरात एका प्रसिद्ध विधी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. संबंधित विद्यार्थीनीने सकाळी आठच्या सुमारास महाविद्यालयात जाण्यासाठी ओला कॅब बोलावली. कॅब चालक तुपेरे मॉडेल कॉलनी येथे विद्यार्थीनीच्या घराखाली बराच वेळ वाट बघत बसला होता. विद्यार्थीनीला येण्यास उशीर झाला. उशीर झाल्याच्या मुद्यावरुन कॅबमध्ये दोघांच्यात वाद झाला. त्यावेळी या तरुणीने त्याला गाडी थांबविण्यास सांगितले. पण तुपेरेने गाडी न थांबवता अचानक रस्ता बदलून दुसऱ्याच रस्त्याने कार सुसाट वेगाने नेण्यास सुरुवात केली. त्यावेळी घाबरलेल्या तरुणीने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष त्याकडे गेल्यानंतर त्यांनी पाठलाग करून कार थांबविली. ही तरुणी कारमधून बाहेर पडताच हा अपहरणाचा प्रयत्न असल्याचे समजले आणि नागरिकांनी कॅब चालक तुपेरेला पकडून ठेवले. नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. अखेर तुपेरे याला अपहरणाचा गुन्हा दाखल करुन अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले. पुढील तपास उपनिरीक्षक वैशाली सज्जन करीत आहेत.