टिळक पंचांगातील तीन दुर्मिळ पुस्तके सापडली

सामना ऑनलाईन । ठाणे

सध्याच्या सोशल मीडियाच्या काळातदेखील पंचांगाचे महत्त्व कमी झालेले नाही. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने तर पंचांगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुटुंबात वर्षानुवर्षे टिळक पंचांग वापरले जाते. या पंचांगाचा १३७ वर्षांचा दुर्मिळ खजिना ठाण्यातील प्राच्यविद्या अभ्यास संस्थेला मिळाला आहे. पंचांगकर्ते श्रीकृष्ण टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलींनी हा अमूल्य ठेवा भेट म्हणून दिला असून ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. त्याशिवाय पंचकाल रूपलिपी, चित्तपावन दर्शन, ग्रीक नाविक ते पेशवाई ही तीन अत्यंत दुर्मिळ पुस्तकेही प्राच्यविद्या संस्थेला मिळाली असून इतिहासाच्या अभ्यासकांना संशोधनाचे नवे दालन यानिमित्ताने खुले झाले आहे.

पंचांगकर्ते श्रीकृष्ण टिळक यांनी अत्यंत मेहनतीने १८७९ ते १०१६ पर्यंतची पंचांगे आपल्या संग्रही ठेवली होती. पंचकाल रूपलिपी हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी हा साठा जमा केला. गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले. ही दुर्मिळ पंचांगे अडगळीत पडून राहण्यापेक्षा त्याचा अभ्यासकांना उपयोग व्हावा या हेतूने प्राच्यविद्या संस्थेला देण्यात आली आहेत. प्रत्येकी दहा पंचांगांचे गठ्ठे मिळाले असून त्याची योग्य ती निगा राखण्यात येणार आहे.

प्राच्यविद्या अभ्यास ही संस्था ठाण्यात १९८० पासून काम करीत असून इतिहासाचे अभ्यासक तसेच पी.एचडीच्या विद्यार्थ्यांना अनेक दुर्मिळ पुस्तके येथे उपलब्ध होतात. ६० हजार ग्रंथांचा ठेवा संस्थेत असून ३६ हजार पोथ्या आहेत. त्याशिवाय वस्तू संग्रहालयांमध्ये दुर्मिळ नाणी, शिल्पे, ताम्रपट असा मोठा खजिना असून आता या संस्थेत १३७ जुन्या पंचांगांची भर पडली आहे. टिळक कुटुंबीयांनी चित्तपावन दर्शन पंचकाल रूपलिपी व ग्रीक नाविक ते पेशवाई हे दुर्मिळ ग्रंथदेखील संस्थेला भेट दिले आहेत. चित्तपावन दर्शन या ग्रंथात चित्तपावनांची आडनावे, कुलग्राम, गोत्र, कुलदेवता या संबंधीची माहिती संकलित केली असून ती संशोधक व अभ्यासकांना उपयुक्त आहेत.

पंचांगकर्ते श्रीकृष्ण टिळक यांनी दिलेली 137 वर्षांची पंचांगे प्रत्येकी दहाच्या गठ्ठय़ात देण्यात आली आहेत. त्यातील अनेक पंचांगे सुस्थितीत असून सर्वात दुर्मिळ असलेल्या पंचांगांचे गरज पडल्यास डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. या दुर्मिळ ठेव्याचा अभ्यासकांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, असे आवाहन प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी केले आहे.