शीव रेल्वे पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद!

मध्य रेल्वेच्या शीव स्थानकाला लागून असलेला शंभर वर्षे जुना पूल शनिवार 20 जानेवारीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून रेल्वे त्याच्या पुनर्बांधणीसाठी पाडकाम हाती घेणार आहे. 24 महिन्यांच्या आत हा पूल पाडून पुन्हा बांधण्याचे नियोजन पालिका आणि रेल्वेकडून करण्यात आले. त्यामुळे सदर पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात येणार आहे.

 मध्य रेल्वेची लोकल सेवा आणखी क्षमतेने चालवता यावी, लांब पल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र पाचवी आणि सहावी मार्गिका टाकता यावी म्हणून रेल्वे सदरचा ब्रिटिशकालीन जुना पूल पाडून नवा उभारणार आहे.  मध्य रेल्वेने पालिका आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने सायन रेल्वे स्थानकाजवळ रस्ते उड्डाणपूलच्या जागी नवीन उड्डाणपूल (आरओबी) बांधण्याची योजना आखली आहे. त्यासाठी सुमारे 39 कोटी रुपये खर्च येणार असून 23 कोटी रुपये मध्य रेल्वे तर 26 कोटी रुपयांचा भार पालिका उचलणार आहे. दरम्यान सदर पुलावरील वाहतूक कशी वळवायची याचे नियोजन होत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून पुलाच्या पाडकामाची तारीख निश्चित होत नव्हती. मात्र आता 20 जानेवारी पासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. दरम्यान सुरुवातीला पूल काढण्याबाबतची प्राथमिक कामे केली जाणार आहेत. प्रत्यक्ष पुलाचे पाडकाम करताना आवश्यकते नुसार ब्लॉक घेतले जाणार असून त्याची सूचना प्रवाशांना दिली जाणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

आयआयटीने केली होती पूल पाडण्याची शिफारस

मुंबईतील ब्रिटिशकालीन पुलांना शंभर वर्षे पूर्ण होऊन गेल्याने त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट पवई आयआयटीने केले होते. तेव्हा पुलाचा ढाचा कमकुवत झाल्याचे अनुमान लावत आयआयटीने शीव स्थानकालगतचा पूल काढून त्याजागी लोखंडी पूल उभारण्याची शिफारस केली होती.