डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या वृद्धाचे अश्लील कृत्य

सामना ऑनलाईन । धारावी 

डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मध्य प्रदेशहून धारावी येथे राहणाऱया मुलीकडे आलेल्या 83 वर्षीय वृद्धाने 15 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या मुलीला एकटीला हेरून तिचे लैगिंक शोषण करणाऱया त्या वृद्धाला शाहूनगर पोलिसांनी अटक केली आहे.

मध्यप्रदेश येथे राहणारे शिवराज (83, नाव बदलेले) यांची मुलगी धारावी येथील पश्चिम रेल्वे कॉलनीत राहते. डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी शिवराज त्यांच्या मुलीकडे आले होते. त्या कॉलनीत असलेल्या मोकळ्या जागेत रहिवाशी वॉक करतात. आजूबाजूच्या परिसरातील लहान मुल खेळण्यासाठी देखील येतात. दोन दिवसांपूर्वी सकाळी शिवराज हे देखील त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यांची तेथे आलेली पिडीत 15 वर्षांची मुलगी भेटली. शिवराज यांनी तिला जवळ बोलवून विचारपूस करण्यास सुरूवात केली. त्यानंतर दोघेही आपापल्या घरी निघून गेले. त्याचदिवशी सायंकाळी पून्हा त्याच ठिकाणी दोघे आले होते. त्यावेळी एकेठिकाणी कोणी नसल्याचे हेरून शिवराज यांनी त्या मुलीला मिठी मारली. तसेच तिच्या गुप्तांगाना हात लावून लैगिंक शोषण केले. शिवराज यांच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलीने आरडाओरड करताच तेथे असलेल्या महिला जमा झाल्या. त्यानंतर मुलीच्या आईने नियंत्रण कक्षाला फोन लावून माहिती दिली. मग शाहूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिवराज यांना अटक केली. पुढच्या आठवडयात त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण त्या आधीच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ते गजाआड गेले.