जॉर्जियात सापडली जगातली सर्वात जुनी दारू

सामना ऑनलाईन । जॉर्जिया

जॉर्जियाची राजधानी असलेल्या तबलिसी या शहराच्या दक्षिणेला सुमारे ८ हजार वर्षांपूर्वीच्या एका मातीच्या जारमध्ये जगातली सर्वात जुनी दारू सापडली आहे. यापूर्वी केलेल्या उत्खननात सापडलेल्या दारूचे अवशेष हे सुमारे सात हजार वर्षं जुने होते. आता ही दारू त्याहीपेक्षा एक हजार वर्षं जुनी असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

हे उत्खनन टोरंटो विद्यापीठाच्या इतिहास संशोधन विभागातर्फे करण्यात आलं होतं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अवशेष नवाश्म युगातले असून यातील काही भांड्यांवर द्राक्षाच्या घोसासह नाचणाऱ्या माणसांची चित्रं रेखाटली आहेत. ही दारू जंगली द्राक्षांपासून बनलेली असून युरेशियातील द्राक्षांपासून बनलेल्या दारूचा सर्वात जुना नमूना आहे.

या संशोधन विभागाचे प्रमुख स्टीफन बाट्युक सांगतात की, पाश्चिमात्य संस्कृतीत दारूला विशेष स्थान आहे. औषधं, पेय, खाद्यपदार्थ अशा अनेक लहानसहान गोष्टींमध्ये दारूचा समावेश फार पूर्वीपासून होत आलेला आहे. त्यामुळे हे दारूचे अवशेष त्याकाळच्या संस्कृती आणि जीवनमानाविषयीचे खात्रीलायक पुरावे आहेत.