मोदी आणि डोवाल यांनी केली ओम पुरींची हत्या…पाक मीडियाचा अजब शोध

सामना ऑनलाईन। इस्लामाबाद

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचा मृत्यू हृदय विकाराने झाला नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांची हत्या केल्याचा अजब शोध पाकिस्तानी मीडियाने लावला आहे. ओम पुरींनी पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले होते, इस्लामबद्दल त्यांना आदर होता यामुळेच मोदींनी त्यांचा काटा काढल्याचा आरोप पाक मीडियाने केला आहे.

पाकिस्तानी वृत्तवाहिनी असलेल्या बोल वाहिनीवर ओम पुरी यांच्यावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात, सूत्रसंचालक आमिर लियाकत याने ओम पुरी यांची हत्या झाल्याचा दावा केला आहे. ओम पुरी यांना इस्लामबद्दल आदर होता, यामुळेच त्यांनी हिंदुस्थानमध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यास विरोध केला होता. तसेच ओम पुरींनी ऊरी हल्यातील नितिन यादव या शहीद सैनिकाबददल अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्यानंतर डोवाल यांनी ओम पुरींना शिविगाळही केली होती. त्यांना यादवच्या गावी जाऊन जाहीर माफी मागण्यासही सांगण्यात आले होते,असे लियाकतने म्हटले आहे.

ओम पुरी यांच्या या भूमिकेमुळे मोदींचा त्यांच्यावर राग होता. त्यातूनच त्यांनी ओम पुरींना ठार करण्याची योजना आखली व डोवाल यांनी त्याला अंतिम स्वरुप दिले असा अजब आरोप लियाकतने या कार्यक्रमात केला. या कार्यक्रमाचा व्हिडिओही सोशल साईटवर टाकण्यात आला आहे.

ओम पुरी यांचे ६ जानेवारीला राहत्या घरी निधन झाले होते. त्यांच्या डोक्यावर मार लागल्याची खूण आढळली होती. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.