‘सेल्फी मैंने ले लिया’ हे गाणं ढिंच्यॅक पूजाचे नाही, तर ‘यांचे’

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘सेल्फी मैंने ले लिया’ हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि एका रात्रीत ढिंच्यॅक पूजा स्टार झाली. तिच्या या विचित्र गाण्यामुळे तिचे लाखो चाहते झाले होते पण हे गाणे तिने लिहलेच नसल्याचे समोर आले आहे. बिग बॉसच्या दहाव्या सिझनमधून अक्षरश: हकालपट्टी करून बाहेर काढलेले वादग्रस्त तथाकथित धर्मगुरू बाबा ओम स्वामी यांनी हे गाणे त्यांनी लिहल्याचा दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे.

‘ढिंच्यॅक पूजा ही माझी भक्त आहे. तिला माहीत आहे की मी खूप मोठा तांत्रिक आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ती माझ्याकडे आली होती. तिला सुपरहीट व्हायचे होते. ती माझ्या सोबत सेल्फी काढत होती त्यावरूनच मला हे गाणे सुचले व लगेचच मी तिला ‘सेल्फी मैंने ले लिया’ हे गाणे लिहून दिले. बघा माझा आशीर्वाद आणि गाण्यांमुळे ती सुपरहीट झाली आणि आज ती बिग बॉसमध्ये आहे, असे ओम स्वामी यांनी सांगितले. यावेळी ओम स्वामी यांनी बिग बॉस सिजन ११ मधील सपना चौधरी व शिवानी दुर्गा या देखील त्यांच्या भक्त असल्याचे सांगितले आहे.

ढिंच्यॅक पूजाने दोन आठवड्यांपूर्वी वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता पण तिला घरात फारशी कमाल दाखवता आली नाही. या रविवारी ढिंच्यॅक पूजा बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाली आहे. आता घरातून बाहेर आल्यानंतर ढिंच्यॅक पूजा बाबा ओम स्वामींच्या या दाव्यावर काय म्हणते ते बघण्यात मज्जा येणार आहे.