सिद्धांत थिएटर्स कुडाळची ‘फक्त लढ म्हणा’ एकांकिका प्रथम

सामना ऑनलाईन । मालवण

‘स्वराध्या फाउंडेशन’ मालवण यांच्या वतीने आयोजित आणि प्राईड लॅंण्ड प्रॉपर्टीज प्रायोजित मामा वरेरकर करंडक २०१७ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत कुडाळच्या सिद्धांत थिएटर्सच्या ‘फक्त लढ म्हणा’ या एकांकिकेने प्रथम क्रमांकासह मामा वरेरकर करंडक पटकावला. पुरुष अभिनय, पार्श्वसंगीत यातही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. १४ व १५ हे दोन दिवस मामा वरेरकर नाट्यगृह येथे ही स्पर्धा संपन्न झाली. दरम्यान, या स्पर्धेत मुंबईच्या ‘दर्दपुरा’ व ‘भगदाळ’ या एकांकिकांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला.

देवगडच्या ‘फायनल डिसिजन’ या एकांकिकेला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. तर वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर उत्कृष्ट नवलेखन पुरस्कार देवगडच्या सोनल उतेकर (फायनल डिसिजन) तर कै. श्रीकांत देसाई उत्कृष्ट वाचक अभिनय पुरस्कार इचलकरंजीच्या संतोष आवाळे (अल्पविराम) यांना प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ परीक्षक लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते योगेश सोमण व नाट्यअभिनेते रवींद्र देवधर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वराध्याचे अध्यक्ष सुशांत पवार, शांती पटेल, मुकेश बावकर, किरण वाळके, सुनील परुळेकर, संध्या परुळेकर, गौरव ओरोसकर, गौरीश काजरेकर, रुपेश नेवगी, अभय कदम, विनायक भिलवडकर, दीपक जाधव, महेश काळसेकर, विलास देऊलकर, महेश पाटकर, सचिन टिकम आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

नाट्यगृहाची वीज व्यवस्था यशस्वीपणे सांभाळल्याबद्दल सुभाष कुमठेकर व राजा केरीपाळे, ज्येष्ठ नेपथ्यकार तारक कांबळी, रुपेश नेवगी व ज्येष्ठ नाट्य अभिनेते राजेंद्र कदम यांचा स्वराध्या गौरव करण्यात आला. या विजेत्यांना संघाना तसेच कलाकारांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. स्पर्धेला नाट्य रसिकांचा प्रतिसाद लाभला. परीक्षकांचा ‘स्वराध्या’च्या वतीने सत्कार करण्यात आला.

अभिनेते योगेश सोमण यांनी नाट्यरसिकांशी दिलखुलास संवाद साधला. एकांकिका नवोदित कलाकारांसाठी एकांकिका मोठे व्यासपीठ आहे. कलाकरांनी रंगमंदिरात भूमिका सादर करताना बागडायला हवे. भूमिका साकारताना अभिनयाचे आत्मपरीक्षण करून आपली भूमिका नाण्याप्रमाणे वाजली पाहिजे. असे सोमण म्हणाले. यावेळी ‘स्वराध्या’चे कौतुक करताना एकांकिका स्पर्धात्मक झाल्या. सर्व संघ स्पर्धेचे भान ठेऊन जिंकण्यासाठी प्रयत्न करत होते. बऱ्याच नवोदित कलाकारांनी चोख भूमिका निभावली, असे सांगितले.

स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके
दिग्दर्शन – प्रथम प्रशांत लोखंडे (भगदाळ), द्वितीय केदार देसाई (फक्त लढ म्हणा), तृतीय जयंत सुत (दर्दपुरा).
पुरुष अभिनय – केदार देसाई (फक्त लढ म्हणा), द्वितीय अभिषेक गावकर (भगदाळ), तृतीय नंदकिशोर जुवेकर (बनी तो बनी). स्त्री अभिनय – प्रथम सोनाली छाया (दर्दपुरा), द्वितीय प्रियांका हांडे (भगदाळ), तृतीय वृषाली जावळे (दर्दपुरा).
प्रकाश योजना – प्रथम राजेश शिंदे (भगदाळ), द्वितीय सत्येंद्र जाधव (पार्टनर्स), तृतीय नंदकिशोर जुवेकर (बनी तो बनी).
पार्श्वसंगीत – प्रथम भूषण तेजम (फक्त लढ म्हणा), द्वितीय राजस पंध्ये (दर्दपुरा), तृतीय स्वप्नील तांबे (पार्टनर्स).
नेपथ्थ – प्रथम गणेश गावकर (भगदाळ), द्वितीय बबन सुतार (ती). तृतीय श्रेयस म्हसराम व अनुप माने (दर्दपुरा).

शिस्तबद्ध नियोजन आणि समयसुचकता

दोन वर्षांपुर्वी मालवण येथील काही समविचारी तरुणांनी एकत्र येत मालवणच्या नाट्यपरंपरेला उर्जिता अवस्था प्राप्त करुन देण्याच्या उद्देशाने ‘स्वराध्या फाउंडेशन’ ही संस्था स्थापन केली. स्पर्धेचे दुसरे वर्ष खर्या अर्थाने लक्षवेधी ठरले ते आयोजकाचं शिस्तबद्ध नियोजन आणि समयसुचकतेसाठी. अप्रतिम सादरीकरण, मग तो दोन एकांकिकां मधला प्रेक्षक आणि परिक्षक संवाद असो वा सुजाण प्रेक्षक सारखी प्रेक्षकांनाही सामावुन घेणारी स्पर्धा असो , सर्व गोष्टी स्पर्धेत नवा रंग भरत जाणाऱ्या होत्या अशी भूमिका नाट्यप्रेमी बंटी केरकर व अन्य प्रेक्षकांनी व्यक्त केली.