ठाण्यात सहा पिस्तूल व १५ जिवंत काडतुसांसह एकाला अटक

सामना प्रतिनिधी । ठाणे

गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी एकाला गुन्हे शाखेने अटक केल्याची घटना ताजी असतानाच खंडणीविरोधी पथकाने बुधवारी सहा पिस्तूल व १५ जिवंत काडतुसांसह २३ वर्षीय सामेन शेखला अटक केली. शस्त्र विक्रीच्या व्यवसायात कुख्यात असलेला सामेन नुकताच साडेतीन वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून सुटला होता. मात्र बाहेर येताच त्याने पुन्हा शस्त्र विक्रीचा धंदा सुरू केल्याने शहरात शस्त्रास्त्रांचा ‘बाजार’ भरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विरार पूर्वेच्या नारायणनगर भागात राहणारा सामेन शेख उत्तर प्रदेशातील बांदा येथून ट्रेनने पिस्तूल, काडतुसं आणून मुंबई, ठाणे परिसरात विकत असे. याबाबत खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, विकास घोडके, पोलीस उपनिरीक्षक अविनाश महाजन यांच्या टीमला सापळा रचण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कोपरी येथील मीठ बंदर रोडवर आलेल्या सामेनच्या या टीमने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून सहा पिस्तूल व १५ जिवंत काडतुसं ताब्यात घेतल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम यांनी सांगितले. सामेनवर कांदिवली, अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून ही शस्त्रे तो ठाण्यात कोणाला विकणार होता, याबाबत तपास सुरू आहे.