वाऱ्याने उडाला, जीव गमावला! पुण्यातील तरुणाचा दुर्दैवी अंत

3

सामना प्रतिनिधी । पुणे

सोसाटय़ाच्या वाऱ्यात किती ताकद असते याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवड येथील आकुर्डी येथे आला. रेल्वे ट्रकवर चालणाऱ्या एका तरूणाचा वाऱ्याच्या झोताने जीव घेतला आहे. प्रशांत नरवडे (३०) असे या तरुणाचे नाव आहे.

प्रशांत नरवडे व त्यांचा मित्र रोहितकुमार विणपत सिंह हे दोघे आकुर्डीजवळील रेल्वे ट्रकवर फिरायला गेले होते. दरम्यान ट्रकवरून पुण्याच्या दिशेने लोणावळय़ाहून एक एक्सप्रेस गाडी येत होती. गाडीला पाहून हे दोघेही ट्रकपासून बाहेर आले आणि काही अंतरावर जाऊन थांबले. दरम्यान भरधाव वेगाने आलेली एक्सप्रेस पुढे निघाली. मात्र त्या दरम्यान, गाडीच्या वेगाने हवेचा झोत तयार झाला. हा झोत इतका प्रचंड वेगात होता की, प्रशांत आणि रोहित दोघेही काहीसे उडाले आणि तोल जाऊन पडले. दुर्दैवाने ते ज्या खड्डय़ात पडले तो खड्डा २० फूट खोल होता. उंचावरून पडल्याने दोघांनाही जबर मार लागला. दोघेही बेशुद्ध झाले. काही वेळाने रोहित शुद्धीवर आला, पण प्रशांतची कोणतीच हालचाल नव्हती. खड्डय़ातील दगडावर डोके आपटल्याने प्रशांतचा मृत्यू झाला. दरम्यान रोहितचीही प्रकृती गंभीर असून त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.