अस्वलाच्या हल्ल्यात एक ठार, दोन जखमी

सामना ऑनलाईन । चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील तिरवंजा जंगलातील कक्ष क्र. २०३ मध्ये बांबू कापणी करत असलेल्या मजुरांवर अस्वलाचा हल्ला झाला. या हल्ल्यात धरमसिंग टेकाम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर प्रेमलाल सयाम आणि संबल सिंग हे दोन मजूर गंभीर जखमी आहेत.

मध्यप्रदेशातून बांबू कापणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात मजूर आले होते. बांबू कापणी करताना अनेकदा अस्वल हल्ला करतात. आजही तशीच घटना समोर आली आहे. धरमसिंग टेकाम यांच्यावर अस्वलाने हल्ला केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेल्या प्रेमलाल सयाम आणि संबल सिंग यांनी अस्वलाला रोखण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ते जखमी झाले. पण अस्वल देखील त्यांच्या प्रतिहल्ल्याने मारला गेला. दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.