होममिनिस्टरमध्ये रंगणार सारेगमप वादकांच्या ‘सौं’सोबत गप्पा

3

सामना ऑनलाईन । मुंबई

कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं? दोघांपैकी कोण जास्त चिडतं? मिस्टर फिरायला नेतात का? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱ्या होम मिनिस्टरचा फॅनक्लब चांगलाच वाढला आहे. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घरातील वहिनींपासून ते सेलिब्रिटी सौभाग्यवतींना बोलतं करणाऱ्या या होम मिनिस्टरमध्ये लवकरच अशा ‘ सौं’ना भेटण्याची संधी मिळणार आहे ज्यांचे ‘अहो’ झी मराठीवरील सारेगमप या कार्यक्रमाचा ‘ताल’ सांभाळतात. सारेगमपच्या मंचावरून रसिकप्रेक्षकांना ताल धरायला लावणारे, संगीताचा ठेका धरून श्रोत्यांना आनंदाची पर्वणी देणारे बासरी वादक अमर ओक, कॅसिओवादक-संगीत संयोजक कमलेश भडकमकर आणि तबलावादक आर्चिस लेले होम मिनिस्टरच्या मंचावर सपत्निक खुलवणार आहेत मनोरंजनाच्या स्वरांनी सजलेला ‘तालबद्ध’ असा एका तासाचा विशेष भाग!

गेल्या दीड दशकापासून होम मिनिस्टर हा कार्यक्रम, राज्यातील तमाम वहिनींचे भाऊजी आदेश बांदेकर आणि झी मराठीवरची सायंकाळी साडेसहाची वेळ हे एक वेगळच समीकरण झालं आहे. गप्पा मारत खेळले जाणारे खेळ आणि सोन्याची नथ आणि भरजरी पैठणी अशी धमाल येते. आता हीच धमाल घेणार आहे ‘संगीतमय वळण’. सारेगमपमधून गायक, परीक्षक, निवेदक नेहमीच रसिकांच्या स्मरणात राहतात, पण ही वादक मंडळी पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर उलगडणार आहेत आपल्या सहजीवनाचा ‘सांगीतिक’ प्रवास!

ही वादक मंडळी आपापल्या संसाराचा ‘ताल’मेल कसा साधतात? ‘सौं’च्या तालावर आनंदाने कसे नाचतात? सुखी सहजीवनची ‘लय’ यांना कशी सापडली? त्यांचं एकमेकांशी कधी ‘वाजतं’ का? एकमेकांच्या कोणत्या सवयींविषयी ते ‘हरकत’ घेतात? एकमेकांना हवी असलेली स्पेस अर्थात ‘जागा’ घेऊ देतात का? अशा एक ना अनेक रंजक प्रश्नांची उत्तरं उलगडणार आहेत ‘संगीतमय’ होम मिनिस्टरच्या एका तासाच्या विशेष भागात.

अमर ओक, कमलेश भडकमकर आणि आर्चिस लेले ‘वाजवण्या’पलीकडे कशाकशात पारंगत आहेत ही जाणून घेण्याची संधी झी मराठीच्या प्रेक्षकांना मिळणार आहे. अमर, आर्चिस, कमलेश हे तिघेही सारेगमपच्या अगदी पहिल्या पर्वापासून झी मराठीवर आपल्या निष्णात वादनाने घराघरात पोहचले आहेत. सारेगपमच्या मंचावर आजवर अनेक नव्या गायकांच्या सुरांना समर्थ ताल देण्यात या तिघांनीही आपल्या वादनकलेचा कस लावला आहे. गायक गातात, परीक्षक समीक्षा करतात आणि नवे गायक उजेडात येतात. यामधील दुवा म्हणून या वादक सेलिब्रेटींची भूमिका मोठी आहे. खूप कमीवेळा या वादकांवर कॅमेऱ्याची नजर जाते. पण आता होम मिनिस्टरमुळे या वादकांना कॅमेऱ्यासमोर आणताना त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील गमतीजमती, नाजूक क्षण, अविस्मरणीय आठवणी असे एकेक कप्पे उलगडण्याचा अनोखा प्रयोग झी मराठीने केला आहे. येत्या रविवारी, २६ नोव्हेंबरला संध्याकाळी ७ वाजता हा होम मिनिस्टरचा धमाल सांगीतिक एका तासाचा विशेष भाग झी मराठीवर दाखवण्यात येणार आहे.