वाघाच्या हल्ल्यात एक जण जखमी

सामना प्रतिनिधी। नंदुरबार

नंदुरबार तालुक्यातील शिरवाडे शिवारातील कोकणी पाडा जंगलात पट्टेरी वाघाच्या हल्ल्यात एक ग्रामस्थ जखमी झाला आहे. भीमसिंग वळवी असे त्याचे नाव असून त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिरवाडे शिवारातील कोकणी पाडा जंगलात पट्टेरी वाघाचा वावर असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली होती. यामुळे काही स्थानिकांच्या मदतीने वन अधिकारी व पोलीस वाघाचा शोध घेत होते. त्याचवेळी झाडात लपलेल्या वाघाने भीमसिंग यांच्यावर हल्ला करत त्यांच्या पोटावरच पंजा मारला. वाघाच्या हल्ल्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला. या गोंधळात वाघ तिथून पळून गेला. दरम्यान, या घटनेनंतर वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक गणेश रणदिवे व त्यांच्या टीमने गावातल्यांना सुरक्षित स्थळी हलवले. वाघाचा शोध घेण्यात येत आहे. ग्रामस्थांनी जंगलात वाघाच्या पंजाचे ठसे दिसल्याचे सांगितले आहे. यामुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.