मेहूल चोक्सीवर आणखी एका फसवणुकीचा आरोप

सामना ऑनलाईन । नागपूर

पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ४०० कोटींचा घोटाळा करून परदेशात पळून गेलेल्या मेहुल चोक्सी याच्यावर आणखी एका घोटाळ्याचा आरोप झाला आहे. मेहूलच्या गीतांजली समूहाने तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप सिटी ज्वेलर्सचे मालक देवेन कोठारी यांनी केला आहे.

कोठारी यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला आहे. ‘माझे सीताबर्डीमध्ये एम.बी. या नावाचं दागिन्यांचं दुकान आहे. २०१३-१४ साली मेहूल चोक्सी यांच्या मालकीच्या गीतांजली फर्मने त्यांचे दागिने विकण्यासाठी मला नियुक्त केलं होतं. याकरता ३० लाख रुपयांचे सहा धनादेश अनामत रक्कम म्हणून कंपनीकडे जमा करण्यात आले होते. सोबतच ५७ हजार रुपये काही दागिन्यांसाठी त्यांच्या बँक खात्यात जमा होते. मात्र, त्यानंतर अनेक दिवस दागिने पाठवण्यात आले नाहीत. वारंवार संपर्क साधल्यानंतर ९५ हजार रुपयांचे दागिने पाठवण्यात आले. ते सर्व दागिने निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे तो माल कंपनीला परत पाठवला. चोक्सी यांच्या कंपनीने तो घेण्यास नकार दिला आणि पैसेही परत केले नाहीत, असा आरोप कोठारी यांनी केला आहे.

‘यामुळे मेहूल चोक्सीविरुद्ध दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. ही याचिका परत घेण्यासाठी चोकसीने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. फोनवरून धमक्‍यासुद्धा दिल्या. मात्र मी याचिका मागे घेण्यास नकार दिल्याने मुंबईत माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केली. याकरता खोटे दस्तावेज तयार केले. अंधेरी पोलिसांनी केलेल्या चौकशीत गीतांजली कंपनीने तक्रारीसाठी खोटी कागदपत्रं तयार केल्याचे उघड झालं. यानंतर मी सावजी सीताबर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली, असं कोठारी यांनी सांगितलं. गीतांजली कंपनीने तयार केलेली खोटी कागदपत्रं, स्टॅम्प पेपर, स्वाक्षऱ्या केलेले दस्तावेज सीताबर्डी पोलिसांनी सोपविण्यात आले आहेत, असंही कोठारी यांनी स्पष्ट केलं.

गीतांजली कंपनीतर्फे विक्रीसाठी जे दागिने दाखवले जायचे आणि प्रत्यक्ष हातात आलेले दागिने यांच्यात मोठी तफावत होती. तसंच सोबतच्या बिलावरची किंमत बाजारभावापेक्षा पाचशेपट जास्त असायची. सर्व दागिने विकण्यासाठी चोक्सीकडून दबाव टाकला जायचा, असे आरोपही कोठारी यांनी केले आहेत.