रजनीकांतच्या 2.0 मध्ये वापरले एक लाख मोबाईल, आतापर्यंतचा सगळ्यात बिग बजेट सिनेमा


सामना ऑनलाईन । मुंबई

बहुचर्चित रजनीकांतचा 2.0 या चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता. 29 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांतसोबत खिलाडी अक्षय कुमारही झळकणार आहे. या सिनेमाचा बजेट 543 कोटी असून हिंदुस्थानमधला हा आतापर्यंतचा बिग बजेट सिनेमा आहे. तसेच या चित्रपटासाठी तब्बल एक लाख मोबाईलचा वापर करण्यात आला आहे.

डॉ. रिचर्ड टेलिकॉम कंपनीशी बदला घेण्यासाठी पुर्ण शहरातील मोबाईल जप्त केले जातात असा एक सीन या चित्रपटात आहे. या सीनसाठी चित्रपट निर्मात्यांनी एक लाख मोबाईल वापरले आहेत.

या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी चेन्नई मधील नोकिया कंपनीचा प्रकल्प बंद झाला होता. चित्रपट निर्मात्यांनी या प्रकल्पातून कमी पैश्यांत हे मोबाईल विकत घेतले. या सीनसाठी डमी फोन्सचाही वापर करण्यात आला. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहेत. आता निर्मात्यांकडे एक लाख फोन असेच पडून आहेत.