मुंबईत वकीलाचा मृत्यू तर प्रख्यात डॉक्टर बेपत्ता

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईमध्ये झालेल्या तुफान पावसात अडकलेल्या एका वकीलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गाडीत गुदमरून या वकीलाचा मृत्यू झाला असावा असा संशय आहे. सायनजवळ ही दुर्घटना घडली आहे. गाडी बंद पडल्याने आणि गाडीबाहेर पडता न आल्याने या वकीलाचा मृत्यू झाला असावा असं सांगितलं जात आहे. प्रियेन असं या वकीलाचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. साडेसातच्या सुमारास तो पोलिसांना बेशुद्धावस्थेत आढळला होता. रूग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

तर बॉम्बे हॉस्पीटलचे प्रख्यात डॉक्टर दीपक अमरापूरकर हे कालपासून बेपत्ता झाले आहेत. पोलिसांकडे ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. ते संध्याकाळी ४.३० ला हॉस्पीटलमधून प्रभादेवी इथल्या त्यांच्या निवासस्थानाकडे निघाले होते. मात्र ते घरी न पोहोचल्याने त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध करायला सुरूवात केली होती. ६.३० वाजता ते लोअर परळ भागातील दीपक टॉकीजपर्यंत पोहोचले होते, तिथून त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला मी चालत जातो तू गाडी घेऊन घरी ये असं सांगितलं होतं. ड्रायव्हर घरी पोहोचला मात्र डॉ.अमरापूरकर घरी पोहोचले नाहीत. त्यांचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे.