धारावीत ज्वेलर्सच्या दुकानावरचा दरोडा फसला, पाच जणांना अटक

8
thief-ran-jail

सामना प्रतिनिधी, मुंबई

धारावी परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात दरोडय़ाच्या तयारीत असणाऱया पाचजणांना पोलिसांनी अटक केली. आयुब बाबू शेख, वसीम शेख, वाहिद अली बागवान, अस्लम खान, मोहम्मद शेख अशी या पाचजणांची नावे आहेत. या पाचहीजणांना न्यायालयात नेण्यात आले तेव्हा न्यायालयाच्या परिसरात आरोपींच्या नातेवाईकांनी पोलिसांना शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी काहीजणांविरोधात निर्मलनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला.

धारावीच्या 90 फिट रोडवर असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानात काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती धारावी पोलिसांना मिळाली. या माहितीची शहानिशा करून पोलिसांनी तेथे साध्या वेशात पाळत ठेवली. रात्री सहाजण तेथे संशयास्पदरीत्या फिरत होते. पोलिसांना पाहून ते पळू लागले. पळून जात असलेल्या पाचजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तलवार, कोयता, नायलॉनची रस्सी असे साहित्य जप्त केले. त्या पाचजणांविरोधात धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. आज त्या पाचजणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 22 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नातेवाईकांनी घातला गोंधळ
न्यायालयाच्या परिसरात आरोपीच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. नातेवाईकांना शांत राहण्याच्या सूचना पोलीस करत होते. या घटनेची माहिती कळताच निर्मलनगर पोलीस घटनास्थळी आले. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त मागवला.

आपली प्रतिक्रिया द्या