अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार, सलमान आणि इमरानची चौकशी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या प्रकरणामुळे हादरली आहे. एका अल्पवयीन तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना दिल्लीतील यमुना विहार परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सलमान उर्फ सोनू (२१) आणि इमरान (२२) या दोन आरोपींना अटक केली असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, १६ वर्षीय पीडितेची आणि सलमानची ओळख होती. १८ फेब्रुवारी रोजी सलमानने पीडितेला गोड बोलून आपल्या घरी नेलं. तिथे सलमानने तिला कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर सलमान आणि त्याच्या तीन मित्रांनी दोन दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेला शुद्ध आल्यानंतर तिने विरोध करायचा प्रयत्न केला असता तिला मारहाण करण्यात आली. तसेच तिच्या गुप्तांगालाही त्यांनी इजा केली. त्यानंतर त्या चौघांनी तिला नत्थुपुरा चौकात फेकून दिलं आणि तिथून पळून गेले.

पीडितेला शुद्ध आल्यानंतर ती घरी पोहोचली आणि तिने घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत सामूहिक बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी त्वरीत हालचाल करीत दोन आरोपींना अटक केली. त्यांच्यावर आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.