पॅकबंद ज्युस पिणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण

3

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

जर तुम्हाला पॅकबंद ज्युसची सवय असेल किंवा मुलांना तसे ज्युस पाजत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण तुम्ही जे ज्युस घेतात ते आरोग्यास घातक ठरू शकतात. त्यातील विषारी घटकांमुळे तुम्ही एकप्रकारे मृत्यूलाच थेट आमंत्रण देत आहात, असे अमेरिकेतील तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनात आढळले आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या एका ग्राहक अहवालामध्ये या संशोधनावर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या अहवालात 45 ब्रँडेड पॅकबंद ज्युसच्या चाचण्या करण्यात आल्या. यावेळी यातील काही ज्युसेसमध्ये कॅडमियम, इनऑर्गेनिक आर्सेनिक, मर्क्युरी (पारा) आणि लिड (शिसे) आढळले. त्यातही यातील सात उत्पादनांमध्ये धातूंचे प्रमाण चिंताजनक होते. जर लहान मुलांनी दिवसातून अर्धा कप जरी हे ज्युस प्यायले तरी त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडू शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबद्दल बोलताना ग्राहक अहवालाचे प्रमुख अधिकारी जेम्स डिकरसन यांनी सांगितले की, आम्ही ज्या उत्पादनांचे परिक्षण केले ते लहान मुलांसाठीच धोकादायक नसून सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी धोकादायक आहे. यामुळे बाजारात मिळणारे पॅकबंद ज्युस पिण्यापेक्षा ताज्या फळांचा रस घरीच बनवून पिणे अधिक सुरक्षित आहे. पॅकबंद ज्युसमध्ये आढळणारी घातक घटकं वेगळी करणं अशक्य आहे. कारण ज्युस पॅकबंद करताना काही विषारी घटकं नैसर्गिकपणे त्यात येतात. यात हवेतील विषाणू, पाण्यातील विषाणू, मातीचे सूक्ष्मकणही एकजीव होतात. तर अनेकवेळा उत्पादनांची पॅकींग करताना नकळतपणेही हे विषाणू उत्पादनांमध्ये प्रवेश करतात, असेही डिकरसन यांनी म्हटले आहे.

तसेच या अहवालात विषारी घटकांचा दुष्परिणाम मुलांच्या मेंदूच्या विकासावरही होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यातही द्राक्ष, मिक्स ज्यूस यात धातूचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेल्या या Minute Maid, R.W. Knudsen, Gerber, Welch’s, Mott’s आणि Juicy Juice या कंपनींचे अर्धा कप ज्युसही धोकादायक असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे.