११वी-१२वी सायन्स शाखेचा देशपातळीवर एकच पेपर पॅटर्न

फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

यापुढे अकरावी, बारावी सायन्स शाखेचा देशपातळीवर एकच पेपर पॅटर्न असणार आहे. विद्यार्थ्यांना नीट आणि जेईई परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे यासाठी या परीक्षांप्रमाणेच अकरावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप ठरविण्यात आले आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित आणि संख्याशास्त्र या विषयांसाठी विविध राज्यांचा अभ्यासक्रम वेगवेगळा असला तरी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप मात्र एकसारखेच राहणार आहे.

कौन्सिल ऑफ बोर्डस् ऑफ स्कूल एज्युकेशन इन इंडिया (कॉब्से) कडून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला सायन्स शाखेच्या चारही विषयांच्या सुधारित प्रश्नपत्रिकांचे आराखडे मिळाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यास मंडळाने प्रश्नपत्रिकेचा आराखडा व राज्याच्या अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिका व गुणविभागणी तयार केली असून त्यास शालेय शिक्षण विभागानेदेखील मान्यता दिली आहे. यंदाच्या वर्षी अकारावीची वार्षिक परीक्षा तर फेब्रुवारी-मार्च २०१९ ची बारावीची बोर्डाची परीक्षा नव्या पेपर पॅटर्ननुसार होणार आहे.

  • भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल नाही.
  • चारही विषयांसाठी १०० गुणांमध्ये ७० गुणांची लेखी तर ३० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा.
  • गणित आणि संख्याशास्त्र (आर्टस्, सायन्स शाखा) विषयाच्या १०० गुणांमध्ये ८० गुण लेखी तर २० गुण प्रात्यक्षिक परीक्षेसाठी.
  • प्रत्येक विषयासाठी एकच प्रश्नपत्रिका व एकच उत्तरपत्रिका राहील. परीक्षेचा वेळ तीन तास असेल.
  • लेखी परीक्षेचा पेपर पॅटर्न बदलण्यात आला आहे, पण प्रात्यक्षिक परीक्षेच्या स्वरूपात बदल झालेला नाही.

आता सलग २९ प्रश्न; उपप्रश्न प्रकार नाही

नव्या पेपर पॅटर्नमध्ये विद्यार्थ्यांना २९ प्रश्न सोडवावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. उपप्रश्न हा प्रकार आता बंद करण्यात आला आहे. तसेच पूर्वी असणारे भाग १ व २ ऐवजी ए, बी, सी, डी अशा स्वरूपात प्रश्नांची मांडणी असेल. चारही विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.