कश्मीर : पाकड्यांच्या गोळीबारात १ जवान शहीद

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये पाकड्यांच्या कुरापती सुरुच आहे. आज (शनिवार) सायंकाळी पाचच्या सुमारास पाकड्यांनी शस्त्रसंधीचे उल्ंलघण करत केलेल्या गोळीबारात हिंदुस्थानचा एक जवान शहीद झाला आहे. नायब सुबेदार जगराम सिंह तोमर (४२) असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. शहीद जवान मध्य प्रदेशच्या तरसाना गावचा रहिवासी होता.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. कुलगामध्ये सुरू असलेल्या एनकाउंटरदरम्यान एक जवान जखमी झाला आहे. एनकाउंटरदरम्यान स्थानिक नागरिकांनी जवानांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांविरोधता लढण्यासाठी परिसरात सीआरपीएफची १८ वी बटालियन, ९० वी बटालियन, ९आरआर आणि एलओसी कुलगाम यांनी कंबर कसली आहे.

दुसरीकडे शोपिया जिल्ह्यामध्ये लष्करी जवानांनी दहशतवाद्यांच्या ठिकाणांना घेरा घातला असून मोठ्या प्रमाणात चकमक सुरू आहे. शोपिया जिल्ह्यातील अवनीरा गावाजवळ ही चकमक सुरू आहे. स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार अवनीरा गावाजवळ हिजबुलच्या ३ दहशतवाद्यांना जवानांनी घेरा घातला आहे. शोपियामध्ये सीआरपीएफची १४ वी बटालियन, ३ आरआर आणि एसओजी जेनपोराचे जवान तैनात आहेत.

कश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कराने २५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांची यादी बनवली आहे. कश्मीरमध्ये मागील ७ महिन्यात १२५ पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.